नवी दिल्लीः लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्या या गळाभेटीची मोदींनी आपल्या भाषणात खिल्ली उडवली होतीच, पण आता पुन्हा या मिठी प्रकरणावरून त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.
'राहुल गांधी हे नामदार आहेत. माझ्यासारखा कामदार त्यांच्याशी काय तुलना करणार? त्यांची स्वतःची एक वेगळी शैली आहे. कुणाचा, कधी द्वेष करायचा आणि कुणावर कधी 'प्रेम' करायचं आणि त्याचा कसा 'शो' करायचा, हे त्यांना नेमकं ठाऊक आहे. त्याबद्दल मी काय बोलणार?, अशी चपराक नरेंद्र मोदींनी लगावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मिठी आणि डोळा मारणाऱ्या राहुल गांधींना बाण मारला.
...अन् राहुल गांधींनी भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठीच मारली!
राहुल गांधींनी मोदींची गळाभेट घेऊन बाजी मारली, असं काही जण म्हणतात. तर, हा बालिशपणा असल्याचं काहींचं मत आहे. त्याबद्दल मोदींना विचारलं असता, हे तुम्हीच ठरवायचंय आणि तुम्हाला हे ठरवता येत नसेल, तर त्यांच्या डोळा मारण्याच्या कृतीतून तुम्हाला उत्तर मिळेल, असं त्यांनी सूचकपणे नमूद केलं.
No Confidence Motion: गळाभेटीनंतर राहुल गांधींनी का मारला डोळा?लोकसभेतील भाषणात काय म्हणाले होते मोदी....
'ना संख्या, ना बहुमत... तरीही 'मोदी हटाओ'साठी ही सगळी झटापट सुरू आहे. आज सकाळी तर मी चकित झालो. चर्चा नुकतीच सुरू झाली होती, मतदानही झालं नव्हतं. जय-पराजयाचा निर्णय झाला नव्हता. पण ज्यांना इथे यायची इच्छा आहे ते आले आणि उठा, उठा, उठा म्हणाले. अहो, इथून कुणी उठवू शकत नाही आणि कुणी बसवू शकत नाही. सव्वाशे कोटी देशवासीयच इथे बसवू शकतात आणि इथून उठवू शकतात. जनतेवर विश्वास असला पाहिजे. इतकी काय घाई आहे इथे बसायची?', अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना टोमणा मारला होता.
उठा, उठा करत आले... एवढी काय घाई आहे इथे बसायची?; मोदींचा राहुल गांधींना टोला
काय म्हणाले होते राहुल...
सगळ्या विरोधकांना आणि तुमच्यातल्या काही लोकांना घेऊन आम्ही पंतप्रधानांना हरवणार आहोत. माझ्या मनात पंतप्रधाबद्दल राग, द्वेष नाही. उलट, मोदी आणि भाजपाचा मी आभारीच आहे. त्यांनीच मला काँग्रेसचा अर्थ सांगितला. भारतीय असण्याचा अर्थ सांगितला. धर्म शिकवला. शिवाचा अर्थ सांगितला. हिंदू असण्याचा अर्थ सांगितला. यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. तुमच्यासाठी मी पप्पू आहे. तुम्ही मला कितीही शिव्या देऊ शकता, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल किंचितही राग नाही, द्वेष नाही. मी काँग्रेस आहे. हे सगळे काँग्रेस आहेत. काँग्रेस या भावनेनंच देश बनवला आहे. ही भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन.