PM Narendra Modi Telangana: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील संगारेड्डी येथे जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधकांना प्रत्युत्तर दिले. 'माझा देश हेच माझे कुटुंब' असल्याचा पुनरुच्चार मोदींनी यावळी केला. विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी कुटुंब प्रथम आहे, तर माझ्यासाठी देश प्रथम आहे.
'तुमच्यासाठी फॅमिली फर्स्ट, माझ्यासाठी नेशन फर्स्ट...'पीएम मोदी म्हणाले, 'विरोधक म्हणतात - फॅमिली फर्स्ट, मोदी म्हणतात - नेशन फर्स्ट...त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंब सर्वस्व आहे. पण, माझ्यासाठी देशातील प्रत्येक कुटुंब सर्वकाही आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या हितासाठी देशहिताचा त्याग केला. मी राष्ट्रहितासाठी बलिदान दिले. या घराणेशाहीने देशाची लूट केली. त्यांनी महागड्या भेटवस्तूंद्वारे काळा पैसा पांढरा केला आणि मी मला मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करुन देशसाठी वापरला. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी काचेचे महाल बांधले, पण मी स्वतःसाठी एक घरही बांधले नाही.'
'माझ्यासाठी देशातील 140 कोटी जनता माझे कुटुंब आहे आणि तुम्ही या कुटुंबावर प्रश्न उपस्थित करता. आज मोदी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिलेली हमी पूर्ण करण्यात व्यस्त आहे, तर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष माझ्या कुटुंबाला शिव्या देण्यात व्यस्त आहेत. कारण मी त्यांचे लाखो रुपयांचे घोटाळे उघड करत आहे. मी या लोकांच्या घराणेशाहीविरुद्ध आवाज उठवत आहे. मी घराणेशाहीला विरोध करतो, घराणेशाही लोकशाहीला धोका असल्याचे सांगतो, तेव्हा हे लोक उत्तर देत नाहीत, अशी घणाघाती टीका मोदींनी यावेळी केली.
'विकसित भारतासाठी कटिबद्ध'मोदी पुढे म्हणतात, 'आज 140 कोटी देशवासी विकसित भारत घडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. या विकसित भारतासाठी आधुनिक पायाभूत सुविधा असणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटी रुपये दिले. तेलंगणाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा, असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आमची सर्व आश्वासन पूर्ण केली, हीच मोदीची गॅरेंटी आहे.'