नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी जागतिक आर्थिक परिषदेच्या (World Economic Forum) दावोस अजेंडा बैठकीत सहभागी झाले होते. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाची क्लिप शेअर करत काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यासोबतच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
कोरोना संकट काळात जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. यावेळी अचानक नरेंद्र मोदी यांना भाषण थांबवावे लागले. यावरून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. टेलिप्रॉम्प्टर (Teleprompter) थांबल्यामुळे पंतप्रधान पुढे बोलले नाहीत, असा आरोप केला जात आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, 'टेलिप्रॉम्पटर सुद्धा इतके खोटे सहन करू शकत नाही.' दुसरीकडे, काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 'हमे तो टेलिप्रॉम्पटरने लूटा, अपनो में कहा दम था', असे म्हणत नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
दुसरीकडे, भाजपा नेत्यांकडूनही काँग्रेसवर पलटवार करण्यात आला आहे. दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी म्हटले आहे की, जागतिक आर्थिक परिषदेकडून तांत्रिक त्रुटी आली होती, त्यामुळे पंतप्रधानांनी भाषण थांबवले.
दरम्यान, असे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की टेलिप्रॉम्प्टरमध्ये दोष आलेला नाही, तर व्यवस्थापकीय टीमने पंतप्रधानांना थांबण्यास सांगितले होते आणि प्रत्येकजण त्यांचा आवाज ऐकत आहे की नाही हे विचारले होते.
जागतिक आर्थिक परिषदेत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कार्यकाळात देशात झालेले 10 मोठे बदल सांगितले आणि आता कठीण काळ संपल्याचे सांगितले. तसेच, भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे, असे सांगत त्यांनी गुंतवणुकदारांना आवाहनही केले.