नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत(LokSabha Election 2024) भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी INDIA आघाडी स्थापन केली. या आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (BJP) एका मीम फोटोद्वारे विरोधी आघाडीचा खरपूस समाचार घेतला.
भाजपने ट्विटरवर पंतप्रधा नरेंद्र मोदींचे पोस्टर शेअर करत, 2024 मध्ये मोदीच परत येणार असल्याचे सांगितले. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना प्रसिद्ध हॉलिवूड सायन्स फिक्शन फिल्म 'टर्मिनेटर'शी केली आहे. यासोबत भाजपने म्हटले, 'विरोधकांना वाटतं की, ते नरेंद्र मोदींचा पराभव करू शकतात. स्वप्न बघा. टर्मिनेटर नेहमी जिंकतो,' असे ट्विट भाजपने केले.
त्यापूर्वी अन्य एका पोस्टमध्ये भाजपने विरोधकांवर जोरदार टीका केली. UPA चे लक्ष्य, भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणे आणि भारताला लुटणे, अशा आशयाची पोस्ट भाजपने केली. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 26 विरोधी पक्षांनी भाजपविरोधात आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची पहिली बैठत 23 जून रोजी पाटण्यात तर दुसरी बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बंगळुरू येथे झाली. आता तिसरी बैठक मुंबईत होणार आहे.