नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 21 एप्रिल रोजी शीख गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त लाल किल्ल्यावरून (Red Fort) देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी माहिती दिली.
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील. मंत्रालयाने सांगितले की, यावेळी 400 रागी (शीख संगीतकार) 'शबद कीर्तन' गातील. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशातील आणि जगातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववे शीख गुरु तेग बहादूर यांच्या प्रकाश पर्वानिमित्त दिल्लीतील शिशगंज गुरुद्वाराला भेट दिली होती.
नरेंद्र मोदींनी ट्विट करून म्हटले होते की, "आज मी गुरुद्वारा शीशगंज साहिबमध्ये प्रार्थना केली. श्री गुरू तेग बहादूर जी यांचे जीवन, आदर्श आणि सर्वोच्च बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही." तसेच, नरेंद्र मोदींनी त्यांचे काही फोटोही ट्विट केले होते. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींनी गुरुद्वाराला भेट दिली होती, तेव्हा सर्वसामान्यांच्या सोयीच्या दृष्टीने रस्त्यांवर कोणताही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता आणि कोणतेही बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते.
दरम्यान, विशेष म्हणजे केंद्र सरकारने गुरु तेग बहादूर यांचे 400 वे प्रकाश पर्व थाटामाटात साजरे करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठकही नुकतीच झाली. या बैठकीत नरेंद्र म्हणाले होते की, गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व साजरा करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.