देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर केंद्रानं कोरोनासंदर्भातील अनेक निर्बंध हटवले होते. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या थोडी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रानं पुन्हा एकदा कंबर कसली असून राज्यांना पत्रही लिहिलं होतं. दरम्यान, आता कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे ही बैठक पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. कोरोनासंदर्भातील या आढावा बैठकीत सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही सामील होण्याची शक्यता आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा मास्क आणि अन्य उपाययोजनांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं.