नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ ऑगस्टला सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी करतील. अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यावर नरेंद्र मोदींनी अनेकदा भर दिला आहे. देशभरातील लोकांसाठी रेल्वे हे वाहतुकीचे पसंतीचे साधन असल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या महत्त्वावर भर दिला. या दूरदृष्टीनुसार अमृत भारत स्टेशन योजना देशभरातील १३०९ स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सुरू करण्यात आली.
या योजनेचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदींच्या हस्ते ५०८ स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी होत आहे. या स्थानकांच्या पुनर्विकासासाठी २४,४७० कोटी रुपयांहून अधिक खर्च केले जाणार आहेत. शहराच्या दोन्ही बाजूंना योग्य प्रकारे जोडून ही स्थानके 'सिटी सेंटर' म्हणून विकसित करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. हा एकात्मिक दृष्टीकोन रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष केंद्रित करून शहराच्या सर्वांगीण नागरी विकासाच्या दृष्टीकोनातून प्रेरित आहे.
ही ५०८ स्थानके देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत, ज्यात उत्तर प्रदेशातील ५५, राजस्थानमधील ५५, बिहारमधील ४९, महाराष्ट्रातील ४४, पश्चिम बंगालमधील ३७, मध्य प्रदेशातील ३४, आसाममधील ३२, ओडिशामधील २५, पंजाबमधील २२, गुजरातमधील २१, तेलंगणामधील २१, झारखंडमधील २०, आंध्र प्रदेशातील १८, तामिळनाडूमधील १८, हरयाणामधील १५ आणि कर्नाटकमधील १३ स्थानकांचा समावेश आहे.
स्थानकाची रचना स्थानिक संस्कृतीपासून प्रेरित असेलपुनर्विकासाचे काम प्रवाशांना आधुनिक सुविधा प्रदान करेल आणि प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी सु-समन्वित वाहतूक सुविधा, आंतर-मॉडल एकत्रीकरण आणि सुव्यवस्थित चिन्हे सुनिश्चित करेल. स्थानक इमारतींचे डिझाइन स्थानिक संस्कृती, वारसा आणि वास्तुकला यांच्यापासून प्रेरित असणार आहे.