नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ केला. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारतभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी त्यांनी पायाभरणी केली. ही सर्व स्थानके अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज होणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी २४,४७० कोटींचा खर्च येणार आहे.
भारतीय रेल्वेच्या इतिहासातही एक नवा अध्याय सुरू होत आहे. भारतातील सुमारे १३०० प्रमुख रेल्वे स्थानके आता अमृत भारत रेल्वे स्थानके म्हणून विकसित केली जातील आणि त्यांचा आधुनिकतेसह पुनर्विकास केला जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सदर योजनेचा फायदा देशातील सर्व राज्यांना होणार असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
रेल्वेमध्ये जेवढे काम केले जाते त्यामुळे सर्वांना आनंद आणि आश्चर्य वाटते. जगातील दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड, यूके आणि स्वीडन सारख्या देशांपेक्षा या ९ वर्षात आपल्या देशात जास्त रेल्वे रुळ टाकण्यात आले आहेत. दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांपेक्षा गेल्या वर्षभरात भारतात जास्त रेल्वे ट्रॅक बांधण्यात आल्याची माहिती नरेंद्र मोदींनी यावेळी दिली.
नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा-
नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. 'विरोधक प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करतात. संसद भवनाच्या नवीन इमारतीला देखील विरोधकांनी विरोध केला. विरोधक स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे गेले नाहीत. त्यांनी सरदार पटेल यांच्यापुढे नतमस्तक झाले नाही. ते काम करणार नाहीत आणि करुही देणार नाहीत, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
जागतिक दर्जाच्या सुविधांना प्राधान्य देणे
पीएमओने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा अत्याधुनिक सार्वजनिक वाहतुकीच्या तरतुदीवर भर देतात आणि रेल्वे हे लोकांच्या वाहतुकीचे पसंतीचे माध्यम आहे. रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. या दृष्टिकोनातून १३०९ स्थानकांच्या पुनर्विकासासाठी 'अमृत भारत स्टेशन योजना' सुरू करण्यात आली.
या स्थानकांचा समावेश
गोधनी, काटोल, नरखेड, औरंगाबाद, किनवट, मुदखेड, अहमदनगर, कोपरगाव, बडनेरा, धामणगाव, परळी वैजनाथ, मलकापूर, शेगाव, बल्लारशाह, चांदा फोर्ट, चंद्रपूर स्थानक, गडचिरोलीचे वडसा (देसाईगंज), गोंदिया, हिंगोली, चाळीसगाव, जालना, परतूर, कोल्हापूर एससीएसएमटी, लातूर स्टेशन, मनमाड, नगरसोल, उस्मानाबाद स्टेशन, गंगाखेड, परभणी जंक्शन, पूर्णा जंक्शन, सेलू, आकुर्डी, दौंड, तळेगाव जंक्शन, कुर्डुवाडी जंक्शन, पंढरपूर, सोलापूर जंक्शन, हिंगणघाट, पुलगाव जंक्शन, सेवाग्राम जंक्शन, वाशिम जंक्शन, परळ, कांजूर मार्ग व विक्रोळी या राज्यातील रेल्वेस्थानकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.