नवी दिल्ली: अलीकडेच Air India च्या खरेदीसाठी लावण्यात आलेल्या बोलीमध्ये TATA ने बाजी मारली असून, तब्बल ६८ वर्षांनी एअर इंडियाची घरवापसी झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात देशभरातून प्रतिक्रिया आल्या. यानंतर एका कार्यक्रमात बोलताना, एअर इंडियाचे खासगीकरण करून दाखवले, यातून आम्ही आमची वचनबद्धता व गांभीर्य दाखवून दिले आहे. आतापर्यंत निर्णायक सरकारे कधीच नव्हती. आम्ही मात्र सुधारणांसाठी वचनबद्ध आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.
नव्याने स्थापन करण्यात येत असलेली ‘इंडियन स्पेस असोसिएशन’ ही संस्था उद्योग क्षेत्राचा बुलंद आवाज बनेल व देशाची प्रगती या संस्थेच्या माध्यमातून साध्य होईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. इंडियन स्पेस असोसिएशन ही संस्था देशांतर्गत व जागतिक संस्थांना अवकाश व उपग्रह तंत्रज्ञानात मदत करील. लार्सन टुब्रो, नेल्को, वन वेब, भारती एअरटेल, मॅप माय इंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज, अनंथ टेक्नॉलॉजी लि. या संस्था यात काम करतील. गोदरेज, अझिस्ता बीएसटी एरोस्पेस प्रा. लि. बीइएल, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स आणि मक्सार इंडिया यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
एअर इंडियाचे खासगीकरण करून दाखवले
आम्ही एअर इंडियाचे खासगीकरण करून दाखवले, यातून आम्ही आमची वचनबद्धता व गांभीर्य दाखवून दिले आहे. सार्वजनिक क्षेत्राची गरज जिथे नसेल तिथे सरकारने काम करू नये. ती क्षेत्रे खासगी उद्योगांना खुली करून द्यावीत, असेच आमचे धोरण आहे. अवकाशापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रे सरकारने आतापर्यंत खासगी क्षेत्राला खुली केली आहेत. देशाचे हितच सरकारने त्यात पाहिले असून त्यातील समाविष्ट घटकांच्या गरजांचा विचार केला आहे. भारताने मोठ्या प्रमाणावर सुधारणा राबवल्या असून आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्न केले आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून 'गती शक्ती योजने'ची घोषणा केली होती. १०० लाख कोटी रुपयांची ही योजना आता लाँच करण्यात येणार आहे. या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी केला जाईल. प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. ही योजना देशातील मास्टर प्लान आणि पायाभूत सुविधांचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या योजनेद्वारे स्थानिक उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवता येईल. यामुळे उद्योगांचा विकास होईल, असे सांगितले जात आहे.