नवी दिल्ली-
राजकीय स्थैर्य आणि गेल्या आठ वर्षांत सातत्यानं केलेल्या सुधारणांमुळे भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण बनलं आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केलं. जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या संस्था तसंच विश्वसनीय दुवा म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे, असंही ते म्हणाले. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (ओईसीडी) भारताबाबत बोलताना सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं म्हटलं आहे.
आज इंदूरमध्ये मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या 'इन्व्हेस्ट मध्य प्रदेश' च्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. "२०१४ पासून देशात सुधारणा, परिवर्तन आणि उत्तम कामगिरी करण्यात आली आहे. कोविड-19 च्या संकटातही आम्ही सुधारणांचा मार्ग सोडला नाही. आत्मनिर्भर भारत मोहिमेने देशातील सुधारणांना मोठी गती दिली आहे. परिणामी, आज भारत हे गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
जागतिक संस्थांचा भारतावर अतूट विश्वास : पंतप्रधान मोदीमजबूत लोकशाही, राजकीय स्थैर्य आणि तरुण मानवी संसाधनामुळे गुंतवणूकदारांचा भारताप्रती आशावाद दिसून येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. "जागतिक अर्थव्यवस्थेवर बारकाईनं लक्ष ठेवणाऱ्या संस्थांनी भारतावर विश्वास दाखवला आहे आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनीही देशाबद्दल असाच आशावाद कायम राखला आहे", असं मोदी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय संस्था भारताबद्दल आशावादी आहेत हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) भारताच्या मजबूत आर्थिक मूलभूत गोष्टींमुळे देशाला जागतिक अर्थव्यवस्थेत "उज्ज्वल स्थान" म्हणून पाहतो. तसंच जागतिक बँकेनंही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अधिक चांगल्या स्थितीत असल्याचं म्हटलं आहे.
भारत रोज नवनवे विक्रम रचत आहे: पंतप्रधान मोदीभारत जागतिक समूहातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं मत ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) ने व्यक्त केलं आहे. भारताकडे सध्या G20 चे अध्यक्षपद देखील आहे. एका नामांकित बँकेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, बहुतांश गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी भारताला पसंती दिली आहे. भारतात थेट परकीय गुंतवणूक (FDI) दररोज नवनवीन विक्रम निर्माण करत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.