नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेत संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच, उपस्थित एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला एनडीएचे सर्व खासदार उपस्थित होते. संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदींचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. एनडीएच्या विजयाबद्दल नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, सलग तीन वेळा जिंकणे ही मोठी गोष्ट असल्याचे सांगत पंडित जवाहरलाल नेहरूंच्यासमोर कुठल्याही अडचणी नसताना ते जिंकले होते. पण आपल्यासमोर अनेक आव्हाने असतानाही एनडीएला एवढा मोठा विजय मिळाला, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन खासदारांना प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, काँग्रेसवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, एकाच कुटुंबातून अनेक पंतप्रधान झाले आणि काही सुपर पंतप्रधान बनले. पण एक चहावाला पंतप्रधान झाल्यामुळे त्यांना ही गोष्ट पचत नाही, म्हणूनच ते आमच्यावर वारंवार हल्ला करत आहेत.
नव्या खासदारांना आवाहन करत संसदेच्या कामकाजात जास्तीत जास्त सहभाग नोंदवा, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडा. सर्व खासदारांनी देशसेवा हीच महत्त्वाची गोष्ट असल्याचे लक्षात ठेवावे. खासदारांनी आपले वर्तन आणि आचरण योग्य ठेवावे. खासदारांनी संसदेच्या नियमांनुसार वागले पाहिजे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
याशिवाय, खासदारांनी आपल्याला ज्या विषयांमध्ये विशेष स्वारस्य आहे, ते विषय शेअर केले पाहिजेत. तसेच, प्रत्येक खासदाराने आपल्या कुटुंबासह पीएम संग्रहालयाला भेट द्यायला हवी. इकडे-तिकडे भाषणे करण्यापेक्षा योग्य व्यासपीठावर आपली मते मांडणे योग्य ठरेल, असा मंत्र सुद्धा नरेंद्र मोदींनी बैठकीत उपस्थित खासदारांना दिला आहे.
काय म्हणाले किरेन रिजिजू?बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "आज पंतप्रधानांनी आम्हाला एक मंत्र दिला, जो खूप महत्त्वाचा आहे. पंतप्रधानांनी एनडीएच्या खासदारांना संसदेचे नियम, संसदीय लोकशाही प्रणाली आणि आचार यांचे पालन करण्याचे आवाहन केले, जे चांगले संसदपटू होण्यासाठी आवश्यक आहे. पंतप्रधानांचे हे मार्गदर्शन सर्व खासदारांसाठी, विशेषत: नव्या खासदारांसाठी एक चांगला मंत्र आहे. या मंत्राचे पालन करण्याचे आम्ही ठरवले आहे."