नवी दिल्ली : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही ऐतिहासिक अशा तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला आज मंजुरी मिळाली. या विधेयकावर घेण्यात आलेल्या मतमोजणीदरम्यान विधेयकाच्या बाजूने 99 आणि विरोधात 84 मते पडली. आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.
राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या विधेयकाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, "संपूर्ण देशासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. आज करोडो मुस्लिम माता-भगिनींचा विजय झाला असून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या तिहेरी तलाकच्या कुप्रथेपासून आज पीडित मुस्लीम महिलांना न्याय मिळाला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त मी सर्व खासदारांचे आभार व्यक्त करतो."
याचबरोबर, नरेंद्र मोदी म्हणाले, "तिहेरी तलाक बिल मंजूर होणे म्हणजे महिला सशक्तिकरणच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. तुष्टीकरणाच्या नावाखाली देशातील करोडो माता-भगिनींना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेण्याचे पाप केले. मला गर्व आहे की, मुस्लिम महिलांना त्यांचा अधिकार देण्याचा गौरव आमच्या सरकारला मिळाला आहे."
दरम्यान, मोदी सरकार परत सत्तेवर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा तिहेरी तलाक विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान, लोकसभेमध्ये भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने हे विधेयक लोकसभेत पुन्हा एकदा पारीत झाले होते. मात्र राज्यसभेत भाजपा आणि मित्रपक्षांकडे बहुमत नसल्याने या विधेयकाचे काय होणार याकडे सर्वांकडे लक्ष लागले होते. अखेर मित्रपक्षांचा सभात्याग आणि विरोधी पक्षांच्या विरोधानंतरही आवश्यक संख्याबळाची पूर्तता करण्यात यश आल्याने तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर झाले.