प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्विटरवरून शोक व्यक्त केला. मोदींनी म्हटले की, स्टीफन हॉकिंग हे महान शास्त्रज्ञ होते. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय जगातील अनेकांसाठी प्रेरणादायी होता. त्यांचे आपल्यातून निघून जाणे ही खूप दु:खाची गोष्ट आहे. त्यांच्या जाण्याने जगाला सर्वोत्तम करण्याच्या पक्रियेचा प्रणेता हरपला, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने त्यांना गौरवले होते. याशिवाय, त्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र हे क्लिष्ट विषय सामान्यांनाही समाजावेत, यादृष्टीने लिखाण केले. त्यांचे 'ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते. हे सिद्धांत वैज्ञानिक जगात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला. हॉकिंग एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यासारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. २००१ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील विज्ञानक्षेत्रातील संशोधन संस्थेने आयोजीत केलेल्या 'स्ट्रींग' या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्या परिषदेत हॉकिंग्ज यांनी दिलेलं व्याख्यान प्रसिद्ध आहे. टीआयएफआरने त्यांना सरोजिनी दामोदरन फेलोशिपही दिली आहे.