इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचलं आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्ध १२व्या दिवशीही सुरू आहे. इस्रायलकडून गाझामधील रुग्णालयावर एअरस्ट्राईक केल्याचा दावा हमासने केला आहे. हमासने म्हटलं आहे की, १७ ऑक्टोबरला रात्री १० वाजताच्या सुमारास इस्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयावर हल्ला केला. या एअरस्ट्राईकमध्ये ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयाला हवाई हल्ला केला आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात जवळपास ५०० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा हमासकडून करण्यात आला आहे. गाझाच्या खान युनूस अल-अहली या रुग्णालयावर इस्रायलने एअरस्ट्राईक केल्याचा दावा हमासकडून केला जात आहे. गाझातील रुग्णालये अनेक नागरिकांसाठी निवारा आहे, त्यामुळे रुग्णालयात मोठ्या संख्येने नागरिक आहेत.
सदर हल्ल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गाझा येथील अल अहली रुग्णालयावरील हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आणि या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला. गाझा येथील अल अहली रुग्णालयात झालेल्या हल्ल्यामुळे खूप धक्का बसला. पीडितांच्या कुटुंबियांप्रती आमची संवेदना आहे आणि जखमी लवकरात लवकर बरे होवोत, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या संघर्षात होणारी नागरिकांची जीवितहानी ही गंभीर आणि सतत चिंतेची बाब आहे. यासाठी संबंधितांना जबाबदार धरले पाहिजे, असं मतही नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, परिचालन आणि गुप्तचर यंत्रणांचं अतिरिक्त परीक्षण केल्यानंतर आयडीएफने गाझामध्ये रुग्णालयावर हल्ला केलेला नाही हे स्पष्ट होत आहे, असे इस्राइली सैन्याने सांगितले आहे. इस्राइली सैन्याने गाझापट्टीमधील अल-अहली बॅपटिस्ट रुग्णालयावर हल्ला केलेला नाही. रुग्णालयावर आदळलेलं रॉकेट हे इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेनं डागलेलं होतं, तसेच ते सोडताना मिसफायर झालं, असा दावा इस्राइलने केला आहे. गाझा येथील दहशतवाद्यांकडून रॉकेटचा मारा करण्यात आला. त्यातील काही रॉकेट अल अहली रुग्णालयाजवळून जात होती. गोपनीय माहितीमधून यामागे इस्लामिक जिहाद ही संघटना असल्याचे संकेत मिळत आहेत.