नवी दिल्ली - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी (14 नोव्हेंबर) शांतीवनला भेट देऊन आदरांजली वाहिली आहे. नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सर्वत्र बालदिनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. 'देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना अभिवादन' अशा शब्दांमध्ये मोदींनी ट्विटरवरुन भावना व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसनेही ट्विटरवरून देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना आदरांजली अर्पण केली आहे. नेहरूंचे विचार ट्विट करून त्यांना अभिवादन केले आहे. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म काश्मीरी पंडिताच्या घरी 14 नोव्हेंबर 1889 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होतं. जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधीच्या साथीने काँग्रेसमध्ये काम केलं.
1929 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. 1941 मध्ये महात्मा गांधींचे उत्तराधिकारी म्हणून जवाहरलाल नेहरू यांची घोषणा झाली. नेहरूंच्या फॅशनची अनेकदा चर्चा झाली. नेहरूंचं बंद कॉलरवालं जॅकेट आजपण लोक पसंत करतात.पंडीत नेहरू हे एक चांगले नेते, वक्ते यासोबत लेखकदेखील होते. नेहरूंनी लिहिलेली पुस्तके नक्कीच वाचायला हवीत.
नेहरूंनी लिहिलेल्या अनेक पत्रांमधून आणि पुस्तकांमधून त्यांना भारताबद्दल किती प्रेम होतं हे दिसून येतं. नेमकं हेच त्यांच्या मृत्यूपत्रात झळकून आलं.नेहरूंनी मृत्युपत्रात लिहिलंय की, माझी इच्छा अशी आहे, माझी राख प्रयागच्या संगमावर वाहणाऱ्या नदीमध्ये सोडावी. त्यामुळे हिंदूस्तानाच्या प्रत्येक कोपऱ्याशी हात जोडून मी समुद्रात मिसळेल. माझ्या राखेतील जास्तीत जास्त भाग विमानातून खाली दिसणाऱ्या शेतांमध्ये पसरवावी. त्यामुळे माझं असणं देशातील प्रत्येक मातीत सामावून जाईल.
देशभरात आज मोठ्या उत्साहत बालदिन साजरा होत आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीला बालदिन साजरा केला जातो. गुगल इंडिया नेहमीच एक खास डुडल तयार करून अनेक मान्यवरांना सलाम करताना दिसते. यावेळीही गुगल इंडियानेही आकर्षक डूडल बनवून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी गुगलने बालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकले आहे. गुगल इंडियाने बालदिन साजरा करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही बालदिनाआधी Doodle 4 Google स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेची थीम 'When I grow up, I hope..' अशी होती. या स्पर्धेत जी मुले भाग घेतात. त्यापैकी एक मुलाचे निवडलेले एक पेंटिंग गुगलकडून आपले डुडल म्हणून तयार करण्यात येते. यावेळी स्पर्धेत भाग घेतलेल्या गुरुग्राममधील दिव्यांशी सिंघल हिच्या पेंटिंगवरून गुगल डुडल करण्यात आले आहे.