नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) ट्विटर अकाऊंट (Twitter Account Hacked ) हे काही वेळासाठी हॅक केल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली होती. मात्र ज्यावेळेत अकाऊंट हॅक झालं तेव्हा करण्यात आलेल्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्या ट्विटचा स्क्रिनशॉट आता तुफान व्हायरल होत आहे. मोदींच्या अकाऊंटवरून बिटकॉईन संदर्भात ट्विट केलं असून भारताने बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे असं म्हटलं होतं मात्र त्यानंतर लगेचच अकाऊंट रिस्टोअर केल्याची माहिती पीएमओकडून देण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने "नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल काही काळासाठी हॅक झालं. त्यानंतर हा मुद्दा ट्विटरकडे उपस्थित करण्यात आला आहे आणि अकाऊंटदेखील त्वरित रिस्टोअर आणि सुरक्षित करण्यात आले आहे. हॅक झाल्यानंतर काही मिनिटांत शेअर केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करा" असं म्हटलं आहे. रविवारी साधारण 2 वाजून 11 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आलं होतं. आता अकाऊंटवरून हे ट्विट हटवण्यात आले आहे.
"भारताने अधिकृतपणे बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे आणि सरकार 500 बीटीसी विकत घेत आहे आणि लोकांमध्ये वितरित करत आहे" असं ट्विट हे अकाऊंट हॅक केल्यानंतर करण्यात आलं होतं. काही युजर्स सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हे ट्विट आता हँडलवरून हटवलं गेलं असलं तरी काही युजर्सनी त्याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.