देशात नव्या संसद भवनाचे काम वेगात सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या इमारतीवर, 20 फूट उंच अशा अशोक स्तंभाचे (राष्ट्रीय चिन्ह) अनावरण केले. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सुरू असलेल्या या कामाचा आढावाही घेतला. या नव्या संसद भवनासंदर्भात संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. यातच AIMIM चे नेते, असदुद्दीन ओवेसी यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
ओवेसी म्हणाले, पीएम मोदींनी राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण करून चूक केली. ट्विट करत ओवेसी म्हणाले, 'संविधान हे संसद, सरकार आणि न्यायपालिका यांचे अधिकार वेगळे करते. सरकारचे प्रमुख असल्याने पीएम मोदी यांनी नव्या संसद भवनावर राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण करायला नको होते. लोकसभेचे अध्यक्ष LS चे प्रतिनिधित्व करतात. जे सरकारच्या अधीन नाहीत. सर्व घटनात्मक नियमांचे उल्लंघन केले आहे.'
नवीन संसद भवनावर उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे वजन 9 हजार 500 किलो आहे. हे नवीन संसद भवनाच्या मध्यवर्ती इमारतीच्या शीर्षस्थानी स्थापित केले आहे. 6.5 मीटर उंच राष्ट्रीय चिन्हाला आधार देण्यासाठी 6.5 हजार किलोग्रॅमची आधारभूत रचनादेखील तयार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनाच्या छतावर हे राष्ट्रीय चिन्ह लावण्याची संकल्पना आणि प्रक्रिया क्ले मॉडेलिंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्सपासून जन्माला आली.