Bronze National Emblem Cast Unveiled: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) सकाळी नवीन संसद भवनाच्या इमारतीवरील कांस्य धातूच्या अशोक स्तंभाचे (राष्ट्रीय चिन्ह) अनावरण केले. यानंतर त्यांनी नवीन संसद भवन पूर्णत्वास नेण्यासाठी जे लोक झटत आहेत, त्यांच्याशी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. नवीन संसद भवनाच्या छतावर कांस्य धातूच्या अशोक स्तंभाच्या अनावरणाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते. कांस्य अशोक स्तंभाची उंची सुमारे 6.5 मीटर इतकी आहे.
नवीन संसद भवनावर उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे वजन 9 हजार 500 किलो आहे. हे नवीन संसद भवनाच्या मध्यवर्ती इमारतीच्या शीर्षस्थानी स्थापित केले आहे. 6.5 मीटर उंच राष्ट्रीय चिन्हाला आधार देण्यासाठी 6.5 हजार किलोग्रॅमची आधारभूत रचनादेखील तयार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनाच्या छतावर हे राष्ट्रीय चिन्ह लावण्याची संकल्पना आणि प्रक्रिया क्ले मॉडेलिंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्सपासून जन्माला आली. ब्राँझ कास्टिंग आणि पॉलिशिंगपर्यंतच्या तयारीच्या आठ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हा महाकाय कलाकल्प उभारण्यात आला.