नवी दिल्ली: आम्ही नेहमीच सभागृहाला संवादाचे एक सक्षम माध्यम, तीर्थक्षेत्र मानत आलो आहोत, जिथे खुल्या मनाने संवाद होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी त्याचा राष्ट्रहितासाठी वापर करुया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांना उद्देशून केले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सुरू झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असल्यानेही या अधिवेशनाला विशेष महत्व आहे. याच कालखंडात देशाला नवे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मिळणार असून त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हा कालखंड फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असून आगामी २५ वर्षात जेव्हा शतक साजरे होईल तेव्हा तो प्रवास कसा असावा, किती वेगाने करावा, कोणती नवी उंची गाठावी याचा संकल्प करण्याचा आणि त्यासाठी संसद देशाला दिशा देईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रहितासाठी काम करण्याचे विरोधकांना आवाहन
गरज पडली तर वाद, टीका झाली पाहिजे. गोष्टींचे विश्लेषण झाले पाहिजे, जेणेकरुन धोरणे आणि निर्णयांमध्ये सकारात्मक योगदान करता येईल. सखोल आणि उत्तम चर्चा झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, सर्वांच्या प्रयत्नाने सभागृह चालते, उत्तम निर्णय घेऊ शकते. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी त्याचा राष्ट्रहितासाठी वापर करुया. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य घालवले त्यांच्या स्वप्नांना लक्षात ठेवत सभागृहाचा सर्वाधिक सकारात्मक उपयोग झाला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान, संसदेत महागाई, अग्निपथ योजना त्याचबरोबर तपास यंत्रणांचा कथित गैरवापर मुद्यांवर चर्चा घ्यावी, अशी मागणी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीत केली. त्यांनी असंसदीय शब्दांच्या यादीवरही आक्षेप घेतला. सरकार ३२ विधेयके आणणार आहे. १४ दिवसांत ही विधेयके संसदेत कशी काय मंजूर होऊ शकतील, अशी विचारणा करत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकार काय करण्याचा प्रयत्न करतेय, असा सवाल केला. भाववाढ, अग्निपथ, देशाच्या संघराज्यीय रचनेवर हल्ला आणि ईडी आणि सीबीआयसारख्या तपास संस्थांचा दुरुपयोग यासह १३ मुद्दे आम्ही उपस्थित केले, असे खरगे यांनी सांगितले.