Manipur Violence : "49 दिवसांपासून मणिपूर जळतंय आणि पंतप्रधान मोदी काहीही न बोलता परदेशात जाताहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 03:35 PM2023-06-19T15:35:33+5:302023-06-19T15:40:52+5:30
Manipur Violence : मणिपूर गेल्या 49 दिवसांपासून जळत आहे आणि 50 व्या दिवशीही पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटावर एक शब्दही न बोलता परदेशात जात आहेत असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
मणिपूरमध्ये सुमारे दीड महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी मणिपूर हिंसाचारावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मणिपूर गेल्या 49 दिवसांपासून जळत आहे आणि 50 व्या दिवशीही पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संकटावर एक शब्दही न बोलता परदेशात जात आहेत असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले, 'मणिपूरमध्ये शेकडो लोक मारले गेले आहेत, हजारो लोक बेघर झाले आहेत, असंख्य चर्च आणि प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त झाली आहेत. आता मिझोराममध्येही हिंसाचार पसरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूरचे नेते या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ मागत आहेत. प्रत्येक दिवस असा विश्वास देत आहे की तोडगा काढण्याऐवजी पंतप्रधान मोदी आणि भाजप संघर्ष लांबवण्यात मग्न आहेत.
पंतप्रधान मोदींना प्रश्न करत केसी वेणुगोपाल म्हणाले की, विश्वगुरु पंतप्रधान मोदी मणिपूरचं कधी ऐकणार? शांततेचे साधे आवाहनही ते राष्ट्राला कधी करणार? एवढेच नाही तर शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांकडून कधी उत्तर मागणार? असा सवालही त्यांनी केला. याआधीही केसी वेणुगोपाल यांनी मणिपूर हिंसाचारावर प्रश्न उपस्थित केले होते.
ते म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी पूर्ण मौन पाळले आहे. त्यांच्या सरकारने आजवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. केंद्र सरकार हे का सुरू ठेवत आहे? या भीषण परिस्थितीला जबाबदार कोण? यासोबतच ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे कारण देश उत्तरे मागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.