वाराणसी : भारतात अनेक सल्तनती आल्या आणि गेल्या. अनेक आक्रमक आले आणि गेले. मात्र, पवित्र काशी या सर्वांना पुरून उरली. या शहराचे महात्म्य आजही कायम आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव केला. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाच लाख चौरस मीटर परिसरात विस्तारलेल्या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते सोमवारी थाटात उद्घाटन झाले. वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा विकास करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्या मनात होता. त्याची स्वप्नपूर्ती सोमवारी झाली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नरेेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व सुमारे तीन हजार निमंत्रित उपस्थित होते.
कामगारांवर पुष्पवृष्टीकाशी विश्वनाथ मंदिराचे नूतनीकरण आणि तेथील कॉरिडॉरची उभारणी करणाऱ्या कामगारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पवृष्टी केली. तसेच त्यांच्यासोबत पंतप्रधानांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
गांधीजींचे स्वप्न झाले पूर्ण - योगी आदित्यनाथकाशी विश्वनाथ मंदिराचा परिसर अत्यंत भव्य असावा हे महात्मा गांधी यांनी १०० वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण झाले आहे. अनेक लोकांनी सत्ता मिळविण्यासाठी महात्मा गांधींचे नाव वापरले, पण त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. पण ती कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविली आहे. मंदिराकडे जाण्यासाठीचे रस्ते अतिशय अरुंद होते. ते पाहून महात्मा गांधी व्यथित झाले होते, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
पाच लाख चौरस मीटरचा कॉरिडॉर
- वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराचा आधीचा परिसर फक्त ३ हजार चौरस मीटरचा होता.
- या परिसरात असलेल्या इतर वास्तू, घरे यांच्या मालकांना पर्यायी जागा किंवा भरपाई देऊन स्थलांतरित करण्यात आले
- त्यानंतर येथील भूमी सरकारने संपादित केली.
- आता काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचा परिसर पाच लाख चौरस मीटरचा झाला आहे.
- या ठिकाणी एकाच वेळी ५० ते ७५ हजार भाविक दर्शन घेऊ शकतात.
सनातन संस्कृतीचे प्रतीक काशी विश्वनाथ धाम हे भारताच्या सनातन संस्कृतीचे, प्राचीन भारतीय मूल्यांचे, प्रतीक आहे, असे मोदी म्हणाले. मोदींनी भाषणाची सुरुवात भोजपुरीतून केली. वाराणसीत येताच ते कालभैरव मंदिरात नतमस्तक झाले. त्यानंतर गंगेत स्नान करून ते काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले.
आक्रमकांनी काशीवर अनेक आक्रमणे केली. शहराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. धर्मवेडाने झपाटलेल्या औरंगजेबाने तलवारीच्या धाकावर येथील संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाची माती जगावेगळी आहे. येथे औरंगजेब आला तर त्याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी शिवाजी महाराज या भूमीत जन्मतात. नरेंद्र मोदी, पंतप्रधान