वाराणसी: गेल्या चार दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हरयाणा, पंजाबमधील हजारो शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वाराणसी दौऱ्यादरम्यान भाष्य केलं आहे. कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र काही जण शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.कृषी कायद्यांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. गैरसमज निर्माण केले जात आहेत. ज्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचा छळ केला, ते आता शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत, असं म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केलं. नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय मिळतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 'सरकारं कायदे तयार करतात. काही प्रश्न स्वाभाविक आहेत. तो लोकशाहीचा भाग आहे. पण गेल्या काही वर्षांपासून वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. आधी सरकारचा निर्णय पसंत न पडल्यास विरोध व्हायचा. पण आता अफवा, संभ्रम तयार केला जातो. भविष्यात याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशी भीती निर्माण केली जाते,' असं मोदींनी म्हटलं.सरकारनं केलेल्या कृषी सुधारणा ऐतिहासिक आहेत. मात्र त्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. आतापर्यंत ज्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलं, त्यांच्याकडूनच आता अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे. याआधी पिकांसाठी हमीभाव असूनही खरेदी कमी व्हायची. शेतकऱ्यांच्या नावाखाली कर्जमाफी माफी व्हायची. पण ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची नाही, असं मोदी म्हणाले. 'नव्या कृषी कायद्यांत जुन्या पद्धतीला रोखणारी कोणतीही तरतूद नाही. आधी बाजाराबाहेर होणारा व्यवहार बेकायदेशीर होता. अशा परिस्थितीत छोट्या शेतकऱ्यांची फसवणूक व्हायची. आता लहान शेतकरीसुद्धा बाजारबाहेर झालेल्या व्यवहाराविरोधात कायदेशीर पावलं उचलू शकतो. शेतकऱ्यांना आता नवे पर्याय खुले झाले असून त्यांना फसवणुकीपासून कायद्यांचं संरक्षण मिळालं आहे,' असं मोदींनी सांगितलं.