हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : कर्नाटकच्या निवडणुकीमधील धक्क्याने जराही विचलित न होता पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे पुढील ४० दिवस अत्यंत व्यग्रतेचे आहेत. देश-विदेशात त्यांचे भरगच्च कार्यक्रम ठरलेले आहेत. पुढील पाच आठवड्यांतील भरगच्च कार्यक्रमांची सुरुवात शुक्रवारी जपान व अन्य देशांच्या ६ दिवसीय दौऱ्याने होईल व २१ ते २४ जूनदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्याने याची सांगता होईल.
मोदी २६ मे रोजी नवीन संसदेचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम जागतिक दर्जाचा करण्याची पंतप्रधानांची योजना आहे. आपल्या सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल देशव्यापी जल्लोषाला मोदी ३० मे रोजी प्रारंभ करण्याची शक्यता आहे. यामुळे ३० मे पूर्वी मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता धूसर होताना दिसते. ३० मे ते ३० जून या कालावधीत जल्लोष साजरा केला जाणार असल्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे फेरबदल एक तर २९ मे रोजी किंवा ३० जूननंतर होण्याची चर्चा आहे.
तीन महत्त्वाच्या शिखर परिषदांना उपस्थितीशुक्रवारपासूनच्या प्रदीर्घ दौऱ्यात मोदी पहिल्या टप्प्यात मोदी जपानच्या हिरोशिमा शहरात १९ ते २१ मेदरम्यान होत असलेल्या जी ७ या उन्नत अर्थव्यवस्थांच्या वार्षिक संमेलनाच्या बैठकीत उपस्थित राहतील. त्यानंतर ते पापुआ न्यू गिनीमध्ये पोर्ट मोरेस्बी येथे जातील. तेथे २२ मे रोजी पंतप्रधान जेम्प मारपे यांच्यासह संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आईसलँड कोऑपरेशनच्या तिसऱ्या शिखर संमेलनात उपस्थित राहतील.