लेह/हैदराबाद - गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधील तणाव विकोपाला गेलेला आहे. दोन्ही देशांनी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याची मोठ्या प्रमाणात तैनाती केली आहे. तसेच सैन्यस्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही वातावरण निवळलेले नाही. त्याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेहचा दौरा करत लडाखच्या सीमेवरील फॉरवर्ड पोस्टवर जाऊन जवानांशी संवाद साधला. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. पंतप्रधानांचा हा दौरा सुरू असतानाच गववानमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नीने मोदींना मोठे आवाहन केले आहे.
आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने हुतात्मा संतोष बाबू यांच्या पत्नी बी. संतोषी यांच्याशी संवाद साधला असता सुरुवातीला त्या भावूक झाल्या, त्यानंतर त्या म्हणाल्या की, आपल्या देशाचं लष्कर खूप शूर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे जवानांचा उत्साह वाढेल. तसेच देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलण्यासाठी बळही मिळेल. मी मोदीजींना आवाहन करते की काहीही झालं तरी आपल्याला तिथून विजयी होऊन परतायचं आहे.
तर संतोष बाबूंच्या पत्नीचे भाऊ पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे जवानांचा उत्साह वाढेल. त्याबरोबरच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. युद्ध करणे दोन्ही देशांसाठी योग्य ठरणार नाही. मात्र आपण आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करू शकत नाही. तसेच कर्नल संतोष बाबू आणि इतर जवानांच्या हौतात्म्याला विसरून चालणार नाही. देशाच्या संरक्षणाचा विषय आला तर कर्नल संतोष बाबू यांच्याप्रमाणे देशाचा प्रत्येक जवान सर्वोच्च बलिदान देण्यासाठी तयार असेल.
गलावनमध्ये भारताच्या २० जवानांना आलेले वीरमरण आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी लेह येथे दाखल झाले. त्यांनी अचानक केलेल्या दौऱ्यामुळे अनेकांना धक्का बसला. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींसोबत सीडीएस बिपीन रावत आमि लष्कर व हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी लष्कर व हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सध्याच्या वस्तूस्थितीची माहिती करून दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या