PM Narendra Modi ISRO Visit: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने इतिहास घडवला. चंद्रयान ३ मोहिमेच्या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण जगात इस्रोचे कौतुक केले जात आहे. यातच परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी मायदेशात परतताच थेट बंगळुरूला गेले. मात्र, यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आले नसल्याचे सांगितले जात आहे. यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण दिले.
मला राहावले नाही म्हणून मी थेट बंगळुरूला आलो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो गाठले. चंद्रयान ३ मोहिमेच्या यशबाबत सर्व शास्त्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. बंगळुरू येथे पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय विज्ञान, जय अनुसंधान’चा नारा दिला. बंगळुरूतील HAL विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. इस्रो मुख्यालयात जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी सिद्धरामय्या का आले नाही, याबाबत सांगितले.
तुम्ही एवढ्या सकाळी कष्ट घेऊ नका
पंतप्रधान मोदींनी सीएम सिद्धरामय्या यांना न बोलावण्याबाबतचे कारण सांगितले. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, तुम्ही इतक्या सकाळी येण्याचा त्रास घेऊ नका. पंतप्रधान कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालय आणि राजभवनाला कळवले की, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी येण्याची गरज नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच मी आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना विनंती केली होती की, एवढ्या सकाळी घाईने येऊ नका. शास्त्रज्ञांना अभिवादन करून निघून जाईन. जेव्हा अधिकृतपणे कर्नाटकात येईन तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल पाळावा. त्यांनी सहकार्य केले, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे अभिनंदन करतो, असे सांगताना, बंगळुरूचे लोक अजूनही तो क्षण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
...म्हणून ठरवले की भारतात गेल्यावर आधी बंगळुरूला जाईन
याशिवाय, जे दृश्य मी बंगलोरमध्ये पाहतोय, तेच दृश्य मला ग्रीस आणि दक्षिण आफ्रिकेतही पाहायला मिळाले. तुम्ही इतक्या पहाटे आलात, मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी परदेशात होतो. म्हणून मी ठरवले की भारतात गेलो की, आधी बंगळुरूला जाईन. सर्वप्रथम मी त्या शास्त्रज्ञांना नमन करेन, असे मोदी म्हणाले.
दरम्यान, दोन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मायदेशी परतले. परंतू, ते दिल्लीला न जाता थेट बंगळुरूला पोहोचले. दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी ग्रीसला पोहोचले होते. सकाळी सहा वाजता मोदींचे विमान एचएएल विमानतळावर उतरले.