नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर रोजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यासह अनेक नेत्यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महात्मा गांधींच्या १५४व्या जयंतीनिमित्त राजघाटावर पोहोचून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, गांधी जयंतीच्या खास दिनानिमित्त मी महात्मा गांधींना अभिवादन करतो. त्यांच्या काळातीत शिकवणीमुळे आमचा मार्गातील अंधार दूर झाला. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक पातळीवर आहे, जो सर्व मानवजातीला एकता आणि करुणेच्या भावना पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. एकता आणि सुसंवाद वाढण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू या. त्यांचे विचार प्रत्येक तरुणातील बदलासाठी सक्षम आहेत, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
दरम्यान, संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरात स्वच्छता अभियानही राबवलं जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले होते. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचा हिंसाचाराचा अवलंब केला नाही, तर सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून विजय संपादन केला. भारतातील आणि परदेशातील लोक आजही त्यांच्या या तत्त्वाचे पालन करतात.