नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात द्वेष पसरविल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी म्हणाले की, द्वेष व संतापाच्या वातावरणाचा फायदा चीन, पाकिस्तान व भारताच्या शत्रूंना होणार आहे. काँग्रेसच्या महागाईवरील हल्लाबोल रॅलीमध्ये ते म्हणाले, आता विरोधकांकडे जनतेत जाण्याशिवाय व थेट संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही. त्यामुळेच काँग्रेस ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहे.तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींसाठी होते. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले व मोदींना ताकद दाखवून दिली. देशात अशी स्थिती आहे की, इच्छा असूनही युवकांना रोजगार मिळू शकत नाहीत. मीडिया, प्रेस, न्यायपालिका, निवडणूक आयोग यावर सरकारचा दबाव आहे. त्यामुळे आमच्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा महत्त्वपूर्ण आहे.
‘ईडीला घाबरणार नाही’आम्ही ईडीला घाबरणारे नाहीत. ज्याला भीती वाटते, तो द्वेष निर्माण करतो. ज्याला भीती नाही, तो द्वेष पसरवत नाही. विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांच्या मागे ईडी व सीबीआय लावली. मी ईडीला घाबरत नाही. तुम्ही ५५ तास ठेवा, १०० तास ठेवा, २०० तास ठेवा, पाच वर्षे ठेवा, मला काहीही फरक पडत नाही. आमचे संविधान देशाचा आत्मा आहे. ते वाचविण्याचे काम प्रत्येक देशवासीयाला करावे लागेल. आम्ही हे काम केले नाही तर हा देश वाचणार नाही. - राहुल गांधी, काँग्रेस नेते
‘गांधी कुटुंबाची विश्वसनीयता जास्त’- काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी रॅलीला संबोधित केले. भाजपच्या लोकांनी लोकशाहीचा मुखवटा धारण केलेला आहे. - गांधी कुटुंबाची विश्वसनीयता पंतप्रधानांपेक्षाही जास्त आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले.- छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यावेळी म्हणाले की, महागाई आणि बेरोजगारी रोखण्यावर नव्हे, तर केंद्र सरकारचे लक्ष राहुल गांधी यांना कसे रोखले जाईल, यावर आहे. - काँग्रेसच्या महागाईच्या विरोधातील रॅलीमध्ये प्रचंड संख्येने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी बॅनर व पोस्टरद्वारे केली.