भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यातील संबंध सातत्याने मजबूत होत आहेत. दरम्यान, यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान मंगळवारी (9 जानेवारी) अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट' मध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. याठिकाणी मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबत नरेंद्र मोदी रोड शो करत आहेत. दरम्यान, 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक देशांचे बडे नेते भारतात आले आहेत.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद शहराचे पोलिस उपायुक्त (वाहतूक-पूर्व) सफीन हसन यांनी रोड शोची माहिती दिली होती. पंतप्रधानांनी यूएईच्या राष्ट्राध्यक्षांचे विमानतळावर स्वागत केल्यानंतर संध्याकाळी तीन किलोमीटर लांबीचा रोड शो सुरू होईल, असे ते म्हणाले. अहमदाबाद ते गांधीनगरला जोडणाऱ्या इंदिरा ब्रिज येथे रोड शो संपेल. ब्रिज सर्कल येथून दोन्ही मान्यवर गांधीनगरमधील आपापल्या स्थळी रवाना होतील, असे हसन यांनी सांगितले.
'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'मध्ये होणार द्विपक्षीय बैठकापंतप्रधान मोदी बुधवारी (10 जानेवारी) गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'च्या 10 व्या सत्राचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, 8 ते 10 जानेवारी या तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात मोदी जागतिक नेते आणि सर्वोच्च जागतिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.