नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन(International Yoga Day 2021) निमित्त जनतेशी संवाद साधणार आहे. पंतप्रधानांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. २१ जून २०२१ आपण ७ वा योग दिवस साजरा करणार आहोत. या वर्षाची थीम योग फॉर वेलनेस आहे. जी शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर केंद्रीत आहे. सकाळी ६.३० वाजता योग दिवसाच्या कार्यक्रमात मी संबोधित करेन असं पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी सांगितले आहे.
माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह संबोधन दूरदर्शनसह अन्य न्यूज चॅनेल्सवर दाखवण्यात येईल. या कार्यक्रमात आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू हेदेखील संवाद साधतील. देशभरात विविध स्थानांवर होणाऱ्या या कार्यक्रमात त्या क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. परंतु कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेता एका ठिकाणी केवळ २० लोकांचा कार्यक्रमात सहभाग असेल.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल सकाळी ७ ते ७.४५ वाजेपर्यंत मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमावेत लाल किल्ला परिसरात योग करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सार्वजनिक योग कार्यक्रमात अधिक लोकांना समावेश नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या भाषणानंतर सकाळी योगा केला जाईल. लोकंही व्हर्चुअल माध्यमातून या योग कार्यक्रमात हजेरी लावतील. त्यानंतर अध्यात्मिक आणि योग गुरू लोकांना संबोधित करतील.