भारत-चीन सीमेवरील 'या' गावाला भेट देणार PM नरेंद्र मोदी; ITBP च्या जवानांसोबत संवाद साधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 12:29 PM2023-10-06T12:29:11+5:302023-10-06T12:31:43+5:30
नरेंद्र मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील शेवटचे गाव गुंजी याठिकाणी भेट देणार आहेत. याठिकाणी पोहोचणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असतील. दरम्यान, पंतप्रधान येणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर येथील सरकार आणि प्रशासन तयारीत व्यस्त आहे, तर दुसरीकडे स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नरेंद्र मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, धारचुलाच्या उंच हिमालयीन प्रदेशात असलेल्या गावांमध्ये कधीही पंतप्रधान पोहोचले नाहीत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, जे येथे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रस्तावित दौऱ्याबाबत सीमावर्ती गावात हालचाली वाढल्या आहेत. प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह मंत्रीही गावात तळ ठोकून आहेत.
उत्तराखंड भाजपचे सरचिटणीस आदित्य कोथरी यांनी येथे पत्रकारांना सांगितले की, प्रस्तावित दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा अल्मोडा जिल्ह्यातील जागेश्वर धामला भेट देतील आणि पूजा करतील. जागेश्वर धाममधील कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी पिथौरागढ जिल्ह्यातील जोलिकांग सीमा भागात जाऊन इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या चौकीवर जवानांसोबत संवाद साधणार आहेत, असे आदित्य कोथरी यांनी सांगितले.
तसेच, याठिकाणी नरेंद्र मोदी स्थानिक ग्रामस्थांची उत्पादने पाहतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील आणि तेथून आदि कैलासाचे दर्शनही घेतील. यानंतर त्याच दिवशी नरेंद्र मोदी पिथौरागढमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील आणि सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादही साधतील. यानंतर नरेंद्र मोदी चंपावत येथील मायावती आश्रमात रात्री विश्रांती घेतील आणि तेथून दुसऱ्या दिवशी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी दिल्लीला रवाना होतील, असे आदित्य कोथरी म्हणाले.
याचबरोबर, नरेंद्र मोदींच्या प्रस्तावित दौऱ्याची तयारी सुरू झाली असून कार्यकर्त्यांसोबतच जनतेतही मोठी उत्सुकता आहे. राज्याच्या विकासाबाबत नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतील आणि नवनवीन योजनाही भेट देतील, अशी आशा आदित्य कोथरी यांनी व्यक्ती केली.