रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा बारावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर एकूण ६०० मिसाईल हल्ले केल्याचा दावा युक्रेनच्या मीडियाने केला आहे. तसेच रशियाने आपले जवळपास ९५ टक्के सैन्य युक्रेनमध्ये तैनात केले आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धांमुळे दोन्ही देशांची वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. यासोबतच पंतप्रधान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी देखील फोनवर बोलणार आहेत, अशी माहिती केंद्र सरकारच्या सुत्रांनी दिल्याचं वृत्त एएनआयने दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमधील राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकं काय बोलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या खार्किव शहरावर मिसाईल डागले आहेत. या हल्ल्यात शहरातील अनेक रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या युद्धात युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान गेल्या अकरा दिवसांमध्ये रशियाने अकरा हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या वतीने करण्यात आल आहे.
‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात-
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी राबविण्यात येत असलेले ‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात आहे. युक्रेनमधून आतापर्यंत १६ हजाराहून अधिक भारतीय परतले आहेत. आज ८ विमाने पाठविण्यात आले असून, १५०० भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. रविवारी ११ विमानांमधून २१३५ भारतीय परतले.