पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) अयोध्येला पोहोचणार आहेत. तेथे ते सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प भेट देणार आहेत. येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानकासह अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. दोन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. पंतप्रधान अयोध्येतील चार नव्याने पुनर्विकसित, रुंदीकरण आणि सुशोभित रस्त्यांचे उद्घाटन करतील – रामपथ, भक्तिपथ, धरमपथ आणि श्री रामजन्मभूमी पथ. पंतप्रधान अयोध्येत रोड शो आणि जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
२०४७ पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी; ३५ हजार कोटी खर्चून होतोय मेकओव्हर
पंतप्रधान जेव्हा अयोध्येला पोहोचतील तेव्हा देशभरातील कलाकारांचे विविध ग्रुप त्यांचे स्वागत करतील. विमानतळ ते रेल्वे स्टेशन, राम पथ मार्ग असे एकूण ४० टप्पे तयार करण्यात आले आहेत. १,४०० हून अधिक कलाकार येथे लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना आजच्या कार्यक्रमासाठी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दाट धुक्यामुळे गुरुवारी अयोध्येला जाऊ शकले नाहीत, त्यांनी तयारीचा आढावा घेतला. शुक्रवारी त्यांनी विमानतळ, रेल्वे स्थानक आणि इतर विकास प्रकल्पांना देण्यात येत असलेल्या शेवटच्या क्षणी टचची प्रत्यक्ष पाहणी केली. पंतप्रधान सकाळी १० च्या सुमारास विमानतळावर उतरण्याची शक्यता आहे त्यानंतर ते अयोध्या धाम जंक्शनवर जातील, जिथे ते पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील. विमानतळ ते रेल्वे स्टेशन हा त्यांचा प्रवास रोड शोच्या स्वरुपात असेल.
नुकत्याच पुनर्विकसित केलेल्या रामपथाच्या दोन्ही बाजूंना तात्पुरते लाकडी बॅरिकेड्स लावण्याचे काम प्रशासनाने गुरुवारी सुरू केले होते. त्यानंतर पंतप्रधान विमानतळावर परततील, नव्याने बांधलेल्या विमानतळाचे उद्घाटन करतील आणि त्यानंतर एका रॅलीला संबोधित करतील, तिथे ते १५,७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करतील. यापैकी ११,१०० कोटी रुपयांचे प्रकल्प अयोध्येतील नागरी सुविधा सुधारण्यासाठी आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आहेत. उर्वरित प्रकल्प उर्वरित राज्यासाठी आहेत. ते दोन नवीन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.