नवी दिल्ली - भारतीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. आज दांडी यात्रेला 89 वर्ष पूर्ण झाली. 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढाईत दांडी यात्रेला महत्त्व आहे. या दिवसाचं महत्त्व जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. दांडी यात्रेच्या निमित्ताने मुठीतल्या मिठाने इंग्रजांचे साम्राज्य हादरवून सोडलं, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
त्याचसोबत मोदी यांनी टिविट्सोबत ब्लॉग जोडलेला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. महात्मा गांधी यांनी असमानता आणि जाती विभाजन या गोष्टींना कधीच थारा दिला नाही. देशाची एकता हेच खरं स्वातंत्र्य आहे, मात्र दुख: आहे की, आत्ताच्या काँग्रेसने जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचं काम केलंय. काँग्रेस सरकारच्या काळात सर्वाधित जातीय दंगली आणि दलितांवर अत्याचार झाले.
नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगमध्ये लिहलंय की, आपल्याला माहीत आहे का दांडी यात्रेमध्ये मुख्य भूमिका कोणाची होती ? ती महान सरदार पटेल यांची होती. पटेल यांनी दांडी यात्रेच्या योजनेत शेवटपर्यंत सहभाग घेतला. मात्र सरदार पटेल यांना ब्रिटीश सरकार घाबरत असल्याने दांडी यात्रा सुरु होण्याच्या काही दिवस आधीच त्यांना अटक करण्यात आली. पटेल यांना अटक केल्यानंतर इंग्रजांना वाटले की गांधी घाबरतील, पण असं काही घडले नाही. इंग्रजांच्या गुलामीविरोधात लढाई सुरुच राहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे लिहितात की, मागील महिन्यात मी दांडीमध्ये होतो, त्याठिकाणी अत्याधुनिक संग्रहालय बनविण्यात आले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की आपण एकदा त्याठिकाणी भेट द्यावी. गांधी यांनी नेहमी शिकवण दिली होती, तुम्ही गरिबांकडे बघा, त्यांची परिस्थिती जाणा आणि नंतर विचार करा की तुम्ही करत असलेल्या कामाचा गरिबाच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो. मला सांगताना गर्व होतोय की, आमचं सरकार महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या याच मार्गावर चालत आहे. गरिबी दूर करून त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे. या गोष्टीचं दुख: आहे की सध्याची काँग्रेस गांधी यांच्या विचारधारेच्या विरुध्द वागत आहे. महात्मा गांधी यांनी अतिरिक्त धनापासून दूर राहायला हवं असं सांगितले होते. मात्र काँग्रेसने जी काही कामं केली ती स्वत:ची तिजोरी भरण्यासाठी वापरली. गरिबांच्या जीवावर काँग्रेसने आपलं जीवन अलिशान बनवलं. बापूंनी घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला मात्र आता काँग्रेस घराणेशाहीला प्राधान्य देतं आहे. 1947 साली महात्त्मा गांधी यांनी सांगितले होते की, भारताच्या स्वच्छ प्रतिमेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. तो व्यक्ती कोणत्याही पक्षाचा अथवा विचारांचा असला तरी चालेल देशाच्या प्रतिमेचे रक्षण करायला हवं. आम्ही भ्रष्टाचाराला आळा घालत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली. मात्र काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे समीकरण देशाने बघितलं आहे. कोणत्याही क्षेत्राचे नाव घेतलं तरी त्यात काँग्रेसने घोटाळा केला आहे.