PM Narendra Modi On 75th Year of Constitution : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.१४) लोकसभेत संविधानावर आपले मत व्यक्त केले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर टीका केली. तसेच, काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
देश जेव्हा संविधानाचे २५ वर्षे पूर्ण करत होता, तेव्हा संविधान हिसकावून घेण्यात आली होते, देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. देशाचे तुरुंगात रूपांतर करण्यात आले होते. प्रेसला कुलूप लावण्यात आले होते. जगात लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा काँग्रेसच्या या कलंकावर चर्चा होईल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, काँग्रेसच्या एका घराण्याने संविधान दुखावण्याची कोणतीही कसर सोडली नाही. ५५ वर्षे एकाच परिवाराने राज्य केले, त्यामुळे देशात काय करायचे, याचा अधिकार देशाला आहे. या परिवाराने संविधानाला प्रत्येक स्तरावर आव्हान दिले आहे. जेव्हा देशाच्या संविधानाला ५० वर्षे पूर्ण होत असताना मलाही मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती. ज्यावेळी ६० वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी हत्तीवरून संविधानाची गौरव यात्रा काढण्यात आली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप करत नरेंद्र मोदी म्हणाले, जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून मुख्यमंत्र्यांना म्हटले की, संविधान आपल्या रस्त्यात आलं तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल करावा लागेल, असे म्हटले होते. तसेच काँग्रेसने वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. ६० वर्षात ७५ वेळा संविधान बदलण्यात आले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
जी परंपरा नेहरूंनी सुरू केली आणि तीच इंदिरा गांधी यांनी पुढे नेली. १९७१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला. त्या निर्णयाला संविधान बदलले गेले. आणि १९७१ संविधान तरतूद केली गेली. त्यांनी देशाच्या न्यायालयाचे पंख कापून टाकले होते. संसद संविधानाच्या कोणत्याही कलममध्ये काहीही करू शकते आणि त्याकडे न्यायालय पाहूही शकत नाही, अशी ती तरतूद होती. न्यायालयाचे हे अधिकार काढून टाकले होते. हे पाप १९७१ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी केले होते, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
याचबरोबर, राजीव गांधींनी संविधानाला आणखी एक गंभीर धक्का दिला. त्यामुळे समानतेच्या भावनेला धक्का बसला. तसेच, भारतातील महिलांना न्याय देण्याचे काम संविधानाच्या मर्यादेच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, पण व्होट बँकेसाठी राजीव गांधींनी संविधानाच्या भावनेचा त्याग करून कट्टरपंथीयांसमोर नतमस्तक झाले होते, असे म्हणत नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.