नवी दिल्ली- गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यांनी अहमदाबादच्या राणीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान केले. मतदान केल्यानंतर नरेंद्र मोदी जवळच राहत असलेले बंधू सोमाभाई यांना भेटायला गेले.
नरेंद्र मोदी आणि सोमाभाई यांची भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली. यावेळी सोमाभाई भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. सोमाभाई यांनी नरेंद्र मोदींना एक महत्वाचा सल्ला देखील दिल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तुम्ही देशासाठी खूप कष्ट घेत आहात. थोडा आरामही करा. भाऊ आणि वडीलकीच्या नात्याने मी त्यांना एवढंच सांगू शकतो. त्यांना प्रचंड मेहनत घेताना पाहून समाधान वाटतं, असं सोमाभाई यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, बंधू पंतप्रधान असल्यानंतरही सोमाभाई अत्यंत छोट्या घरात राहत असून साधं जीवन जगत आहेत.
गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप सर्व 93 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवाय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सर्व 93 जागांवर लढत आहेत. काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत असून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाने (BTP) 12 उमेदवार उभे केले आहेत आणि बहुजन समाज पक्षाने (BSP) 44 उमेदवार उभे केले आहेत.