नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे. यात मोदी यांनी म्हटले आहे की, देशात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताच्या एखाद्या सरकारला सलग दुसऱ्यांदा जनतेने जबाबदारी सोपवली होती. हा अध्याय रचण्यात तुमची खूप मोठी भूमिका होती. म्हणूनच हा दिवस म्हणजेतुम्हाला वंदन करण्याची,भारत आणि भारतीय लोकशाही प्रति तुमच्या या निष्ठेला प्रणाम करण्याची माझ्यासाठी संधी आहे.
मोदी यांनी म्हटले आहे की, २०१४ मध्ये देशातील जनतेने देशात एक मोठे परिवर्तन आणण्यासाठी मतदान केले होते. २०१९ मध्ये तुमचा आशीर्वाद देशाच्या भव्य स्वप्नांसाठी होता. मागील एका वर्षात देशाने कायम नवी स्वप्ने पाहिली, नवीन संकल्प केले, आणि हे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी निरंतर निर्णय घेत पावले देखील उचलली.
या पत्रात मोदी यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय एकता-अखंडतेसाठी कलम ३७० असेल, अनेक तपांच्या जुन्या संघर्षाचा सुखद परिणाम राम मंदिर बांधायला परवानगी असेल, तीन तलाक असेल किंवा मग भारताच्या करुणेचे प्रतीक नागरिकत्व सुधारणा कायदा असेल, ही सर्व कामगिरी तुमच्याही स्मरणात आहे. त्यात कोरोना महामारीने भारतालाही विळखा घातला. आत्मनिर्भर भारत अभियानासाठी दिलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.