वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी वाराणसीत रोड शोदरम्यान एका रुग्णवाहिकेला जाण्यासाठी पीएम मोदींनी आपला ताफा थांबवला. या दौऱ्यात PM मोदी वाराणसी आणि पूर्वांचलसाठी 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 37 प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते नमो घाटावरुन काशी तमिळ संगम 2.0 चे उद्घाटनही करतील.
पीएम मोदींनी त्यांच्या रोड शो दरम्यान रुग्णवाहिकेला रस्ता देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी ताफा थांबवून रुग्णवाहिका जाण्यासाठी मार्ग काढला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच पीएम मोदी गुजरातच्या अहमदाबादमध्ये मेगा रोड शो करत होते, सुमारे 30 किमी लांबीचा रोड शो होता. या वेळी रुग्णवाहिकेला मार्ग देण्यासाठी त्यांनी आपला ताफा बाजूला केला होता.
गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजीही पंतप्रधान मोदींनी अहमदाबादहून गांधीनगरला जात असताना ताफ्यात अडकलेल्या रुग्णवाहिकेला मार्ग त्यांचा ताफा थांबवला होता. याशिवय, नोव्हेंबरमध्येही पंतप्रधान मोदी हिमाचलमधील चंबीच्या दौऱ्यावर होते आणि त्यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिका अडकली, तेव्हा त्यांनी ताफा थांबवला आणि रुग्णवाहिकेला मार्ग दिला.
वाराणसी दौऱ्यात काय करणार?वाराणसी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी संध्याकाळी नमो घाटावरुन काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान येथून कन्याकुमारी ते वाराणसी या काशी तामिळ संगम एक्सप्रेसलाही हिरवी झेंडी दाखवतील. आजपासून 31 डिसेंबरपर्यंत काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीत तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील सुमारे 1,400 लोक वाराणसी तसेच प्रयागराज आणि अयोध्येला जातील.