नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून आगामी काळात मांडण्यात येणारं अर्थसंकल्प सर्वांना खूश करणारं नसणारेय. यामध्ये सरकारकडून आर्थिक सुधारणांना दिशा देण्यावर भर असणार आहे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (21 जानेवारी) दिलेत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणांची प्रक्रिया कायम राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवाय, मांडण्यात येणारं अर्थसंकल्प हे लोकप्रियदेखील नसणार, असेही संकेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत. सरकार आपल्या सुधारणांच्या अजेंड्यावर चालणार आहे, म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत अर्थव्यवस्थांच्या पाच प्रमुख गटांतून बाहेर येऊन जगातील एक वेगळी व आकर्षक अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. 'टाईम्स नाऊ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत संकेत दिलेत. दरम्यान, यावेळी लोकांना खूश करणारा अर्थ संकल्प असेल का ?, असा प्रश्न विचारला असता पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, लोकांना मोफत गोष्टी आणि सूट हवी असते, ही एक धारणा झाली आहे.
या प्रश्नावर त्यांनी असेही सांगितले की, देशाला पुढे नेणे आणि मजबूत करण्याची गरज आहे? की राजकीय संस्कृती-काँग्रेसच्या संस्कृतीचं अनुसरण करायचं आहे?, हे सर्वात आधी ठरवावे लागेल. पंतप्रधान मोदी पुढे असेही म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला प्रामाणिक सरकार हवे आहे. सर्वसामान्य जनतेला सूट किंवा मोफत वस्तू नकोत. ही तुमची (मोफत गोष्टींची इच्छा ) कोरी कल्पना आहे. आमच्या सरकारचे निर्णय जनतेच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहेत. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या सरकारच्या आर्थिक धोरणांचा जोरदार बचाव केला.
जीएसटीसंदर्भात त्यांनी सांगितले की, आमचे सरकार जीएसटीसंदर्भात करण्यात आलेल्या सूचनांचा विचार करत आहोत जेणेकरुन अधिक कार्यक्षम प्रणाली तयार केली जाऊ शकते आणि त्यातील कमतरता दूर होण्यास मदत होईल.
भारत जागतिक अर्थव्यवस्थेचे ‘इंजिन’, डाव्होसमध्ये जागतिक आर्थिक फोरमवर पंतप्रधान मांडणार विषय
दरम्यान, जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच ‘इंजिन’ आहे, असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १३० सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ सोमवारी डाव्होसला (स्वित्झर्लंड) रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी मंगळवारी त्यामध्ये भारताची आर्थिक भूमिका मांडतील. जागतिक आर्थिक फोरमची (डब्ल्यूइएफ) ४८ वी बैठक आल्प्स गिरीशिखरांच्या कुशीत वसलेल्या डाव्होसमधील एका रिसॉर्टमध्ये होत आहे. डब्ल्यूईएफचे अध्यक्ष क्लाऊस श्वॉब हे सोमवारी त्याचे उद्घाटन करतील. मात्र पाच दिवस चालणा-या या परिषदेत पंतप्रधान मंगळवारी विषय मांडतील.
मंगळवारी होणा-या मुख्य भाषणात मोदी हे तरुण व आधुनिक भारताचे चित्र मांडणार आहेत. भारतातील उद्योगाभिमूख वातावरणासाठी उचलण्यात आलेली पावले, भ्रष्टाचारावर आणलेला आळा, काळ्या पैशांविरुद्धची मोहिम, कर संरचनेचे सुलभीकरण व यामार्फत विकासाला मिळणारी गती, हा विषय पंतप्रधान मोदी मांडतील, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.
या परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख आणि उद्योजांकसह जगभरातील ३ हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही सहभागी होणार आहेत. मात्र मोदी व ट्रम्प हे वेगवेगळ्या दिवशी डाव्होसमध्ये असल्याने त्यंची भेट होणार नाही. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासीही दाखल होणार आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांची त्यांच्यासोबत कुठलिही बैठक होणार नाही, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. मात्र मोदी हे स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बेरसेत यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.भारतीय योगविद्येचे मार्केटिंग-या परिषदेच्या निमित्ताने भारतीय योगविद्येचे मार्केटींग केले जाणार आहे. सोमवारी रात्री पंतप्रधानांनी आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीवेळी योगविद्याचे सादरीकरण केले जाणार आहे. यासोबतच मेजवानीमध्ये भारतातील विविध खाद्य पदार्थांचा समावेश असेल. डब्ल्यूइएफच्या परिषदेसाठी जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एच.डी. देवेगौडा यांच्यानंतरचे पहिलेच पंतप्रधान आहेत.