पंतप्रधान नरेंद्र मोदीनेपाळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी भगवान बुद्धांची जन्मभूमी असलेल्य लुंबिनीला भेट दिली. यावेळी मोदी म्हणाले, नेपाळशिवाय आमचे रामही अपूर्ण आहेत. आज भारतात भव्य राम मंदिर उभारले जात असतानना नेपाळमधील लोकांनाही याचा आनंद असेल. हा देश आपली संस्कृती जपणार आहे. एवढेच नाही, तर मोदी म्हणाले, आपला सामायिक वारसा म्हणजे आपली संस्कृती आणि आपले प्रेम आहे. हे आमचे भांडवल आहे. ते जेवढे मजबूत असेल, तेवढेच आपल्याला बुद्धाचा संदेश जगापर्यंत पोहोचवता येईल.
आज जगात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत भारत आणि नेपाळचे घनिष्ठ संबंध संपूर्ण मानव जातीच्या हिताचे काम करतील. यातच, भगवान बुद्धांप्रती असलेली दोन्ही देशांची आस्था आपल्याला एका धाग्याने बांधते, एका कुटुंबाचा सदस्य बनवते.
पंतप्रधान म्हणाले, बुद्ध हे बोधही आहेत आणि शोधही आहेत. ते विचारही आहेत आणि संस्कारही आहेत. एवढेच नाही, तर महात्मा बुद्ध यांनी केवळ उपदेशच दिला नाही, तर मानवतेला ज्ञानाची अनुभूतीही करून दिली आहे. प्राप्तीपेक्षाही अधिक महत्व त्यागाचे आहे. याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली, म्हणून महात्मा बुद्ध हे विशेष आहेत, असेही मोदी म्हणाले.
बुद्धांचे जीवन पूर्णत्वाचे प्रतिक - मोदी म्हणाले, 'बुद्धांनी सांगितले होते, की स्वतःच स्वतःचे दीपक बना. माझे विचारही विचारपूर्वक स्वीकारा.' महात्मा बुद्धांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि या दिवशी त्यांना बोधगया येथे ज्ञानप्राप्तीही झाली आणि यानंतर याच तिथिला त्यांचे निर्वाणही झाले. हा केवळ योगायोग नव्हता. ही मानवी जीवनाची परिपूर्णता आहे. पौर्णिमा हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे. महात्मा बुद्ध हे भौगोलिक सीमांच्याही वर होते. ते सर्वांचे आहेत आणि सर्वांसाठी आहेत. भगवान बुद्धांशी माझेही विशेष नाते आहे. यात एक अद्भुत आणि सुखद योगायोग आहे.
वडनगरसोबत महात्मा बुद्धांचं नातं - मोदी म्हणाले, माझा जन्म ज्या वडनगरमध्ये झाला, ते प्राचिन काळी बौद्ध शिक्षणाचे मोठे केंद्र होते. तेथे आजही मोठ्या प्रमाणावर अवशेष निघत आहेत. काशीच्या जवळच असलेल्या सारनाथसोबतची माझी आत्मीयता आपल्यालाही माहीत आहे, असेही मोदी म्हणाले.