नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर देशवासीयांना संबोधत भाषण केले. आपल्या भाषणाची सुरुवात यावेळी मोदींनी मेरे प्यारे परिवारजन म्हणत केली. देशातील १४० कोटी भारतीयांना उद्देशून मोदींनी कुटुंबातील सदस्य असल्याचा उल्लेख आजच्या संपूर्ण भाषणात केला. भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी मणिपूरचा उल्लेख करत आता मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचं म्हटलं. देश मणिपूरच्या नागरिकांसोबत आहे. मणीपूरने गेल्या काही दिवसांत जी शांतता राखली आहे. तशीच राखावी, कारण यातूनच समाधानाचा मार्ग निघेल, असे मोदींनी म्हटले. मोदींनी आपल्या सर्वसमावेश भाषणात भविष्यातील अनेक बदलांचे संकेत दिले. तसेच, गेल्या १० वर्षातील जमा-खर्चाचा हिशोबच मांडत असल्याचेही म्हटले.
देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून सलग १० व्यांदा तिरंगा ध्वज फडकावल्यानंतर, पंतप्रधान उपस्थित नागरिकांना संबोधित करत होते. यावेळी, मणिपूर ते मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कामगार, कारागिर यांपर्यंत सर्वांचा विषयांना प्राधान्य देत मोदींनी भाषण केले.
गेल्या काही आठवड्यांत इशान्य भारतात विशेषतः मणिपूरमध्ये आणि भारताच्या इतरही काही भागांत, मात्र प्रामुख्याने मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानासोबत जो प्रकार घडला. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहे. त्यासाठी सरकारही योग्य ते प्रयत्न करत करत राहील, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आज मणिपूरच्या नागरिकांना दिला. त्यानंतर, सर्वसमावेश भाषण करताना मोदींनी गेल्या १० वर्षातील जमा-खर्चाची संक्षिप्त आकडेवारीच मी देशवासीयांना देत असल्याचे सांगत. काही आकडेवारीही जाहीर केली.
मी लाल किल्ल्याच्या प्राचीन ऐतिहासिक स्थळावरुन गेल्या १० वर्षातील हिशोब देशवासीयांना देत आहे. १० वर्षांपूर्वी राज्यांना ३० लाख कोटी रुपये भारत सरकारतकडून जात होते. गेल्या ९ वर्षात हा आकडा १०० लाख कोटी रुपयांवर येऊन पोहोचला आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी ७० हजार कोटी रुपये दिले जात होते. आता, हा आकडा ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगितले. तसेच, गरिबांच्या घरासाठी यापूर्वी ९० हजार कोटी रुपये खर्च केले जात होते. आता, ४ लाख कोटी रुपये गरिबांच्या घरासाठी खर्च केले जात आहेत. गेल्या ५ वर्षात १३.५० कोटी भारतीय गरिबीतून मध्यमवर्गीयांत वर्ग झाले असल्याचंही मोदींनी सांगितलं. यांसह विविध आकडेवारी आहे, पण मी ती इथं सांगत नाही, असे म्हणत मोदींनी आपल्या भाषणातील इतर मुद्द्यांवर बोलण्यास सुरुवात केली.
२०१४ मध्ये आम्ही देशाची सुत्रे हाती घेतली, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगात १० व्या स्थानी होती. गेल्या, ९ वर्षात झालेल्या आर्थिक बदलातून भारताची अर्थव्यवस्था जगाच्या ५ व्या स्थानी आली आहे, यापूर्वी भ्रष्टाचाराच्या विळख्यात देश अडकला होता, असेही मोदींनी म्हटले.