ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे इतिहाससंशोधकांना नेताजींच्या अंतिम दिनांसंदर्भातील गुढ उकलण्यास सहाय्य होईल अशी आशा आहे.
नेताजींसदर्भात उपलब्ध असलेला समग्र सरकारी दस्तावेज डिजिटल स्वरुपात संग्रहित करण्यात आला आहे. हा दस्तावेज खुला करावा अशी मागणी नेताजींचे वारस तसेच सर्वसामान्य भारतीय अनेक काळापासून करत होते.
गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला नेताजींच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी नेताजींशी संबंधित फाईल्स सरकार सार्वजनिक करेल अशी ग्वाही त्यांना दिली होती. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ४ डिसेंबरला ३३ फाईल्स सार्वजनिक करण्यासाठी राष्ट्रीय अभिलेखागाराच्या सुपूर्द केल्या होत्या. दरम्यान, नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी आपल्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला असण्याची पूर्ण शक्यता आहे; परंतु आणखी काही पुरावे समोर आल्यास आपण खुल्या मनाने हे स्वीकारण्यास तयार आहोत,अशी भावना व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, नेताजींशी संबंधित या फाईल्स सार्वजनिक झाल्याने आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यता नाही. याऐवजी भारत सरकारने जपान सरकारच्या मदतीने रिनकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या त्यांच्या अस्थींची डीएनए चाचणी करून घ्यावी म्हणजे या संपूर्ण वादावर पडदा पडेल.
१९९७ साली अभिलेखागाराला आझाद हिंद सेनेशी संबंधित ९९० फाईल्स संरक्षण मंत्रालयाकडून मिळाल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये गृहमंत्रालयाने नेताजींच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या खोसला आयोगाच्या १०३० फाईल्स व दस्तावेज तसेच मुखर्जी आयोगाच्या ७५० फाईल्स आणि दस्तावेज सोपविले होते. हे दस्तावेज यापूर्वीच जाहीर झाले आहेत.फाईल्स सार्वजनिक करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर गृह आणि विदेश मंत्रालयानेही त्यांच्याजवळील फाईल्स सार्वजनिक करण्याची प्रक्रिया सुरू करून त्या अभिलेखागाराच्या सुपूर्द केल्या होत्या.
सुरुवातीला १०० फाईल्स सार्वजनिक करण्यात येणार असून त्यांचे डिजिटलीकरण केले आहे. या फाईल्स चांगल्या पद्धतीने सांभाळण्यात आल्या असून अभिलेखागाराने दर महिन्याला २५ फाईल्सच्या डिजिटल प्रती लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
netajipapers.gov.in या वेबसाईटवर या फाईल्स सर्वसामान्यांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.
PM Modi releases digital version of declassified #NetajiFiles#NetajiSubhasChandraBosepic.twitter.com/Nn2dvoF7mO— ANI (@ANI_news) January 23, 2016