नवी दिल्ली : प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याचा पाचवा टप्पा 16 मे रोजी आयोजित केला जाणार आहे. या दरम्यान 22 राज्यांमधील 45 केंद्रांवर 16 मे रोजी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करणार आहेत. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पाचव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. 16 मे रोजी पंतप्रधान मोदी 70 हजाराहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्र देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बेरोजगार तरुणांना ज्वॉइनिंग लेटर जारी करणार आहेत. त्याचबरोबर, हा दिवस महत्त्वाचा बनवण्यासाठी भाजपनेही वेगवेगळ्या राज्यांमध्ये तयारी सुरू केली आहे. वरिष्ठ मंत्र्यांना वेगवेगळ्या केंद्रांवर होणाऱ्या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. पीयूष गोयल मुंबईत, धर्मेंद्र प्रधान भुवनेश्वरमध्ये, अश्विनी वैष्णव जयपूरमध्ये, हरदीप सिंग पुरी कपूरथला, निर्मला सीतारामन चेन्नईमध्ये, नरेंद्र सिंह तोमर रतलाममध्ये, ज्योतिरादित्य शिंदे भोपाळमध्ये आणि अनुराग सिंह ठाकूर शिमल्यात उपस्थित राहणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रातील सर्व मंत्रालये आणि विभाग ही भरती करतील. केंद्रीय मंत्री प्रत्येक मंत्रालय आणि विभागातील नियुक्त्या आणि रिक्त पदे भरण्यावर लक्ष ठेवत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या रोजगार मेळाव्यात आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, लोको पायलट, तंत्रज्ञ, पोस्टल सहाय्यक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लिपिक, स्टेनोग्राफर, वैयक्तिक सहाय्यक, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचारी आणि ग्रंथपालांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांनी रोजगार मेळावा योजना सुरू केली होती. 22 ऑक्टोबर 2022 रोजी पहिला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये 75 हजार नवीन नियुक्ती प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आणि दुसरा मेळावा 22 नोव्हेंबर 2022 रोजी देशातील अनेक केंद्रांवर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 71 हजार ज्वॉइनिंग लेटर देण्यात आले. याशिवाय, 20 जानेवारी 2023 रोजी तिसऱ्या रोजगार मेळाव्यात आणि 13 एप्रिल 2023 रोजी चौथ्या रोजगार मेळाव्यात 70 हजारांहून अधिक नियुक्ती प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.