मोहाली:पंजाब दौऱ्यावर असताना पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना घडली होती. त्या घटनचे पडसाद देशभरात उमटले असून, हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात गेले आहे. दरम्यान, त्या घटनेनंतर आता 50 हून अधिक वकिलांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन धमकीचा कॉल करण्यात आला आहे. तसेच, पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची जबाबदार स्विकारली आहे. कॉल करणाऱ्यांनी शीख फॉर जस्टिसशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. काही मीडिया रिपोर्टमधून ही माहिती देण्यात येत आहे.
सुनावणी न करण्याचा इशारा
या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व AOR (अॅडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड) वकिलांना पाचारण करण्यात आले आहे. सिक्युरिटी लॅप्सशी संबंधित याचिकेवर सुनावणी करण्यापासून दूर राहण्याची विनंती शिख फॉर जस्टिसने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. कॉल आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या एओआरने सांगितले की, यूकेमधून त्यांना हा धमकीचा फोन आला आहे.
'1984 शिख दंगली आठवा...'कॉल करणाऱ्याने स्वतःला शीख फॉर जस्टिसचा सदस्य असल्याचा दावा केला होता. AOR म्हणाले की, कॉल करणाऱ्याने पंतप्रधानांच्या ताफ्याला रोखण्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच, 1984 मध्ये शिखांच्या हत्येसाठी सर्वोच्च न्यायालयाला एकही गुन्हेगार सापडलेला नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करू नये, असा इशाराही दिला आहे.
लुधियाना बॉम्बस्फोटात नाव समोर आले होते
गेल्या महिन्यात लुधियाना येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सिख फॉर जस्टिसचे नाव पुढे आले होते. दुसरीकडे, गेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मार्चदरम्यान झालेल्या हिंसाचारामागेही सिख फॉर जस्टिसचा हात असल्याचेही मानले जात आहे. शिख फॉर जस्टिसची स्थापना 2007 मध्ये अमेरिकेत झाली. पंजाबला भारतापासून वेगळे करुन त्याला खलिस्तान म्हणून मान्यता देणे हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. अमेरिकन वकील गुरपंतवंत सिंग पन्नूला शीख फॉर जस्टिसचा प्रमुख चेहरा मानले जाते.