जयशंकर गुप्त, नवी दिल्लीकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि डीएलएफ यांच्या जमीन व्यवहाराला हरियाणा सरकारने दिलेली मंजुरी हे आचारसंहितेचे उल्लंघन नाही, असे सांगत निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिल्यानंतर भाजपा बचावाच्या पवित्र्यात आली आहे़ निवडणूक आयोगाला या व्यवहाराशी संबंधित पूर्ण तपशील न दिल्याचा दावा भाजपाने केला आहे़ तिकडे काँग्रेसने याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे़वाड्रा आणि बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी डीएलएफ यांच्या जमीन व्यवहाराला हरियाणा सरकारने दिलेली मंजुरी आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप भाजपाने केला होता़ भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे प्रकरण लावून धरले होते़ तसेच यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती़ तथापि आयोगाने हरियाणा सरकारला क्लीन चिट दिल्यानंतर प्रसाद आज बचावाच्या पवित्र्यात दिसले़ आयोगाला पाठविण्यात आलेल्या हरियाणा वित्त आयुक्ताच्या अहवालात गुडगावचे डीसी(उपायुक्त) यांनी दिलेल्या आदेशाचा उल्लेख नाही, असा दावा त्यांनी केला़ आयोगाच्या क्लीन चिटनंतर जणू या व्यवहारात घोटाळा झालाच नसल्याच्या थाटात काँग्रेस वावरू लागली आहे़ जी जमीन वाड्रांनी फेबुवारी २००८ मध्ये ७़५ कोटींना खरेदी केली होती़ तीच जमीन त्याचवर्षी तीन महिन्यानंतर डीएलएफला विकली गेली, याकडे त्यांनी लक्ष वेधले़ हरियाणात भाजपाचे सरकार आल्यास या व्यवहाराची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.