ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - सर्जिकल स्ट्राईकवर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी दिलेल्या भाषणावर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन जोरदार आक्षेप घेतला आहे. मनोहर पर्रिकरांनी केलेल्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोहर पर्रिकरांवर निशाणा साधला आहे. सुरजेवाला म्हणाले, "सेनेच्या कारवाईचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न हा दुर्दैवी आहे. त्या वक्तव्यावर मनोहर पर्रिकरांनी स्वतःहून माफी मागावी. 1962, 1965 1971, 1999ला केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये सैनिकांनी दिलेल्या बलिदानाला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर खोट सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाचे संरक्षण मंत्री सैनिकांचं धाडस आणि शौर्याचा अपमान करू पाहत आहेत. लष्करानं 1968मध्ये दिलेल्या बलिदानाला कमी लेखत आहेत. लष्कराच्या बलिदानावर ते राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत", असा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे.
(मनोहर पर्रीकर म्हणतात, 'हवे तर तुम्हीही घ्या श्रेय')
त्यापूर्वी सर्जिकल स्ट्राईक कारवाईच्या श्रेयातील सर्वाधिक वाटा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचा आहे, असे वक्तव्य पर्रिकर यांनी केले होते. मात्र सर्जिकल स्ट्राईकची कारवाई लष्कराने केली आहे, कोणत्याही राजकीय पक्षाने नाही, त्यामुळे जे कोणी सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करत आहेत, ते देखील याचे श्रेय घेऊ शकतात, असे म्हणत मनोहर पर्रिकरांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.