नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक भीतीच्या छायेखाली जगत असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा देश कोणा एका पक्षाचा किंवा ठराविक लोकांचा नसल्याचं स्पष्ट करावं अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकार जातीय भेद निर्माण करत असल्याचा आरोपही केला.
फारुख अब्दुल्ला यांनी ‘मला वाटतं देशात दुर्घटना सुरू आहेत. आपल्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार असून अशा दुर्दैवी परिस्थितीत आपण सापडलो आहोत. आम्हाला लोकांमध्ये शांतता आणि समजूतदारपणा हवा आहे. मात्र दुर्दैवाने या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष अनेक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून हेच आपल्या देशाचे दुर्दैव आहे’, असे म्हटले आहे.
'मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया, असं बोलणं मोदींना शोभतं का?'फारूक अब्दुल्ला यांनी मोदींवर याआधीही टीका केली आहे. मोदी नेहमी आपल्या भाषणात स्वत:च्या आई-वडिलांचा उल्लेख करतात. मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया ?. पण पंतप्रधानांना हे शोभतं का, असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला होता. फारूक अब्दुला यांनी मोदींच्या भाषणावरुन त्यांना लक्ष्य केलं. पीएम म्हणतात की माझ्या आईला शिवी दिली, माझ्या वडिलांना शिवी दिली. पण, पंतप्रधानांना हे शोभा देतं का ? मी कधीही माझ्या भाषणात आई-वडिलांचा उल्लेख करत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी नेहमी उच्च विचार करायला हवा, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले होते.