नवी दिल्ली - भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. चीनवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. राजनाथ सिंह यांनी हे मान्य केले की, चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे. एकीकडे भारत सरकार चीनविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे दाखवत आहे. मात्र, चीनला जशास तसे उत्तर दिले जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून मोदी सरकारवर करण्यात येत आहे. आता, एमआयएमचे नेते व खासदार असुदुद्दीने औवेसी यांनीही मोदी सरकारला सवाल केला आहे.
खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी लडाख सीमारेषेवरील कारवाईवर शंका उपस्थित करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारने 19 जून रोजी चीनची गुंतवणूक असलेल्या बँकांकडून तब्बल 5521 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी शेअर करत हाच का चीनला मुँह तोड जवाब असे औवेसी यांनी म्हटले आहे. लडाख सीमारेषेवर तैनात चीनी सैन्य व भारतीय जवानांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामध्ये, भारताच्या 20 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. चीनला मुँह तोड जवाब देणार असे, पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. मात्र, 15 जून रोजी देशाचे 20 जवान शहीद झाल्यानंतर, केवळ 5 दिवसांतच सरकारने 5521 कोटी रुपयांचे कर्ज चीनकडून घेतले आहे. मग, हाच का तुमचा मुँह तोड जवाब असे म्हणत औवेसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशासाठी हौतात्म्य पत्कारणाऱ्या जवानांचा हा किती मोठा अपमान आहे, असेही औवेसी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. औवेसी यांनी टेलिग्राफ इंडिया या वेबसाईडच्या बातमीची लिंक शेअर करत पंतप्रधानानांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी संसदेत लडाख सीमारेषेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
संरक्षणमंत्री संसदेत म्हणाले
भारतीय लष्कराची प्रशंसा करून सिंह म्हणाले की, चिनी कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले व त्यात चीनचे मोठे नुकसान झाले. राजनाथ सिंह हे सांगत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. राजनाथ यांच्या निवेदनावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांना बोलण्याची परवानगी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे सदस्य विरोध दाखवून सभागृहातून निघून गेले. सभागृहाबाहेर अधीर रंजन यांनी आरोप केला की, सरकार विरोधकांचा आवाज ऐकत नाही कारण त्याला भीती आहे की, जे खोटे बोलले जात आहे ते उघडे पडेल. सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, ते लडाखवर चर्चा करू इच्छित नाही.
राहुल गांधींची संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
राजनाथ सिंह यांच्या भाषणानंतर लगेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘संरक्षणमंत्र्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसते की, मोदी यांनी देशाची चिनी अतिक्रमणावर दिशाभूल केली, देश लष्करासोबत उभा राहील. परंतु, मोदीजी तुम्ही कधी चीनविरुद्ध उभे राहाल? चीनकडून आमच्या देशाची जमीन केव्हा परत घेणार, चीनचे नाव घ्यायला घाबरू नका.’सरकारच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने आरोप केला की, मोदी आणि त्यांचे सरकार संसदेत व बाहेर चिनी घुसखोरीवरून खोटे बोलत आहे.
चीनी सरकारी वृत्तपत्रातून धमकी
पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी नेते एकीकडे शांततेचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून युद्धाची धमकी देण्यात आली आहे. चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन म्हणाले की, चिनी सैन्य भारतीय टँक नष्ट करण्याचा सराव करीत आहे. मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्र्यांमधील पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी भारत सरकारने केली नाही, तर चिनी सैन्य भारताला योग्य उत्तर देण्यास तयार आहे, अशी धमकी त्यांनी दिली.