संजय शर्मा
नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या १४ खासदारांचे संसदेतून निलंबन करण्यात आल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधानांची नाराजी पाहून खासदारांच्या निलंबन वापसीचा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेच्या १३ व राज्यसभेच्या एका खासदाराला संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. या मुद्द्यावर विरोधकांचा गदारोळ व निदर्शनांमुळे आजही संसदेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे अंतिम अधिवेशन असेल. यानंतर फेब्रुवारीमध्ये लेखानुदानासाठी औपचारिकरीत्या अधिवेशन बोलावले जाईल. परंतु, ते पूर्ण अधिवेशन समजले जात नाही.
साेमवारी ताेडगा?
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाने नाराज आहेत. पंतप्रधानांनी गुरूवारी सकाळी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सरकारच्या रणनीतीकारांना सांगितले होते की, या मुद्द्यावर राजकारण होता कामा नये.
कोणत्याही त्रुटी असतील तर त्या कमी करण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या या निर्देशानंतरही १४ खासदारांच्या निलंबनाने राजकीय रंग घेतला आहे. पंतप्रधानांनी फटकारल्यानंतर आता सरकारचे रणनीतीकार निलंबन परत घेण्याबाबतचा मार्ग शोधत आहेत.
विरोधी पक्षांच्या नेत्यांशी आता मागील दाराने चर्चा सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, येत्या सोमवारी या मुद्द्याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
सुरक्षेत त्रुटी कशा राहिल्या?
आदेश रावल
नवी दिल्ली : दोन दिवसांपासून संसदेतील गोंधळ कायम आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी १३ डिसेंबरच्या घटनेवर सभागृहात उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र, सरकारकडून सभागृहात कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. गृहमंत्री शाह सभागृहात येऊन संपूर्ण घटनेवर निवेदन करत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू शकणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.
संपूर्ण विरोधी गट ‘इंडिया’ची एकच मागणी आहे की, सुरक्षेत त्रुटी कशा राहिल्या, हे सरकारने सभागृहाला सांगावे. प्रत्यक्षात या घटनेपासून आतापर्यंत दिल्ली पोलिसांनीही मौन बाळगले आहे.
एका मिनिटात संसद पडली ठप्प
विरोधी सदस्यांनी सतत गदारोळ केल्यामुळे शुक्रवारी लोकसभा आणि राज्यसभेत एका मिनिटांत कामकाज ठप्प पडले. यामुळे गुन्हेगारी कायद्यांची जागा घेणारी तीन विधेयके रखडली.