ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्यानंतर आता राहुल गांधींनी मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. मोदींनी गोरक्षकांना दिलेला संदेश हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात बैरिया गावात बुधवारी गोरक्षकांच्या बेदम मारहाणीत एक जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पंतप्रधानांनी गोरक्षकांबाबत केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. उस्मान अन्सारी नामक व्यक्तीच्या घराजवळ गाय मृतावस्थेत आढळल्यानंतर जवळपास 100 जणांच्या एका टोळक्यानं घरात घुसून अन्सारी यांना मारहाण करत घर पेटवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं होतं. गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते", असं मोदी बोलले आहेत. आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. महात्मा गांधींच्या देशात आहोत, याचा का म्हणून विसर पडतो ? अशी खंतही मोदींनी यावेळी व्यक्त केली होती. तर मोदींच्या भूमिकेला विरोधकांनीही लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदींनी नोंदवलेला निषेध फक्त शब्दांचा खेळ आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही अशी टीका एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, ममता बॅनर्जी यांनी केली होती. मोदींनी फक्त शब्दांचा खेळ केला. ते जे बोलले तसे त्यांनी करून दाखवावे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये फरक आहे, असं म्हणत असदुद्दीन ओवैसींनी मोदींवर निशाणा साधला होता.
Too little too late. Words mean nothing when actions out do them pic.twitter.com/TQHagHAc4C— Office of RG (@OfficeOfRG) June 29, 2017
मोदी या मुद्द्यावर दोनदा बोलले तरीही त्याचा काही परिणाम झाला नाही. गेल्या वर्षी दादरीमध्ये घरात बीफ ठेवल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलाखची जमावाने हत्या केल्यानंतर मोदी या विषयावर बोलले होते. त्यावेळीही त्याचा काहीही परिणाम दिसला नाही. गोरक्षकांना भाजपा आणि संघाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतो, असे ट्विट ओवैसींनी केले होते. पहलू खानची हत्या करणा-या तिघांना अजून का अटक झालेली नाही ? याचे कारण राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे, असे ट्विट ओवैसींनी केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करून गोरक्षेच्या नावाखाली झालेल्या हत्येचा निषेध नोंदवला आहे.