'95 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीला मोदींनी उपमुख्यमंत्री का केलं?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:34 PM2019-11-24T15:34:11+5:302019-11-24T15:37:00+5:30
95 हजार कोटींच्या भ्रष्ट्राचारी अजित पवार यांना एका रात्रीत कुठूनतरी उचलून थेट राज्यपालांसमोर आणले जाते.
नवी दिल्ली - राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अधिकच वाढत गेला आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवाच ट्विस्ट पाहायला मिळाला. राज्यातील या भाजपा-राष्ट्रवादी आघाडीची देशभरात चर्चा रंगली. त्यानंतर, देशभरातील नेते याबाबत आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यात, सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले आणि हिंदी मीडियाचे नामवंत पत्रकार रविश कुमार यांनी ब्लॉग लिहून मोदींना लक्ष्य केलं आहे. राज्यातील सत्ता स्थापनेवरुन रविश कुमार यांनी मोदींना प्रश्न विचारले आहेत.
95 हजार कोटींच्या भ्रष्ट्राचारी अजित पवार यांना एका रात्रीत कुठूनतरी उचलून थेट राज्यपालांसमोर आणले जाते. त्यानंतर, देवेंद्र फडमवीसांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते. ज्या देवेंद्र फडणवीसांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उचलून महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची प्रतिमा उंचावली, ओळख निर्माण केली. त्याच अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनविण्यात आलं आहे. गेल्यावर्षीच भाजपा सरकारच्यावतीने अँटी करप्शन ब्युरोने अजित पवारांविरुद्ध उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल करत त्यांना मुख्य आरोपी बनवले आहे. म्हणजेच, संकटसमयी अजित पवार आपल्या कामी यावेत, यासाठीच त्यांच्यावर टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. कारण, याप्रकरणी अद्याप कुठलिही कारवाई करण्यात आली नाही.
22 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी खटला दाखल केला. त्यामध्ये 70 जणांना आरोपी करण्यात आले असून अजित पवार त्यापैकीच एक आहेत. त्याच, अजित पवारांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी केलं आहे. आता, याप्रकरणात ईडी हात टाकण्याची हिंमत करेल का, असा सवाल रविश कुमार यांनी विचारला आहे. तसेच, का ईडीपासून वाचविण्याच्या अटीवरच हे साठलोठ केलंय? असेही रविश यांनी म्हटले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांनी 95 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या नावामागे जी लावून त्यांस उपमुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, नॅचरली करप्शन पार्टीचे आमदार आता तुम्हाला सोबत कसे चालतात, ते आमदार आता प्रामाणिक झाले का? असा सवालही रविश यांनी विचारला आहे.